रत्नागिरीच्या कलाकारांची आंतरराष्ट्रीय भरारी
rat1p11.jpg-
07769
मुंबई : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डुन्नू चित्रपटाचे रौप्यपदक दिग्दर्शक अभिनव सिन्हा यांच्या हस्ते स्वीकारताना डुन्नूचे दिग्दर्शक सुमित मालप व गंधार मलुष्टे.
---------
रत्नागिरीच्या ‘डुन्नू’ची आंतरराष्ट्रीय यादीत झेप
चित्रपट महोत्सव; ५० तासांत तयार झालेल्या चित्रपटाची ‘टॉप २५’ मध्ये निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रत्नागिरीतील कलाकारांनी साकारलेल्या ‘डुन्नू’ या चित्रपटाची ‘टॉप २५’ मध्ये निवड झाली आहे. अवघ्या ५० तासांत चित्रित केलेला हा चित्रपट लक्ष्यवेधी ठरला. रत्नागिरीतील ‘दी लास्ट टेबल स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या या फिल्मला रौप्यपदकाने गौरवण्यात आले. मुंबईतील सुप्रसिद्ध मेहबूब स्टुडिओमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला. यामुळे रत्नागिरीचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेते अभिषेक बच्चन, शाहीद कपूर, नवाझुद्दिन सिद्दिकी, अनन्या पांडे यांच्यासह दिग्दर्शक अनुराग बासू, अनुभव सिन्हा आणि रवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नांची खाण अशी रत्नागिरीची आधीपासूनची ओळख आहेच; पण आता वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यक्ती रत्नागिरीचे नाव स्वकर्तृत्वाने मोठे करत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा १५ वे वर्ष होते. ५० तासांमध्ये चित्रपट बनवण्याची आव्हानात्मक स्पर्धा या महोत्सवात आयोजित केली होती. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दिलेल्या विषयावर संकल्पना, कथा-पटकथा, कलाकार आणि चित्रीकरण स्थळाची निवड, चित्रीकरण, फिल्मचे संकलन-संपादन, गाणी, संगीत असे सगळे टप्पे केवळ ५० तासांमध्ये पूर्ण करून तयार झालेला चित्रपट स्पर्धेसाठी सादर करावा लागतो. या स्पर्धेत जगभरातील २३ देशांतील ३५० शहरांमधून ४० हजारांहून अधिक फिल्म्स सहभागी झाल्या होत्या. त्यातून ‘दी लास्ट टेबल स्टुडिओ’च्या ‘डुन्नू’ या चित्रपटाची ‘सर्वोत्कृष्ट २५’ मध्ये निवड झाली. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी रत्नागिरीतील ‘अनबॉक्स’चे गौरांग आगाशे आणि नंदाई डिजिटल मार्केटिंगचे धीरज पाटकर यांचे सहकार्य लाभले. या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात नवा तुरा खोवला गेला असून, या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट १
यांनी घडवला डुन्नू
‘डुन्नू’ चित्रपटात विष्णू घाणेकर, गंधार मलुष्टे, रियांश साखरपेकर, गणेश राऊत, सुनील बेंडखळे, शमिका घाणेकर, मयूर दळी यांच्या भूमिका आहेत. तर डुन्नूचे लेखन, दिग्दर्शन सुमित मालप, सहदिग्दर्शक मयूर दळी, व्हिडिओ एडिटिंग निखिल पाडावे, मयूर दळी, छायाचित्रण साईप्रसाद पिलणकर, सिद्धराज सावंत, गीत : केतकी चैतन्य, संगीत व गायन ओंकार बंडबे, म्युझिक अॅरेंजर पंकज घाणेकर, लाइन प्रोड्युसर ऋत्विक सनगरे यांचे होते.
कोट
आंतरराष्ट्रीय, भव्य आणि प्रतिष्ठित महोत्सवात नामांकन मिळणं, ही आमच्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट होती; मात्र पुरस्कार सोहळ्यात डुन्नूने रौप्यपदक पटकावलं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या मातीचं, आपल्या रत्नागिरीचं नाव पोहोचवलं त्यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी नाही. हे यश एका व्यक्तीचं नाही, हे त्या प्रत्येकाचं आहे. ज्यांनी या फिल्मसाठी जीव ओतून मेहनत घेतली, आपल्या कलेचा सर्वोच्च आविष्कार दाखवला. त्या अथक परिश्रमांचं आज रौप्यपदकाच्या रूपानं गोड फळ आमच्या हाती आलं आहे.
- सुमित मालप, लेखक, दिग्दर्शक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

