कणकवलीत कडक बंदोबस्तात मतदान; निकालाकडे लक्ष

कणकवलीत कडक बंदोबस्तात मतदान; निकालाकडे लक्ष

Published on

07962
07963
कणकवली : विद्यामंदिर हायस्कूल मतदान केंद्रावर दिव्यांग आणि वृद्ध मतदारांनीही मतदानाचा हक्‍क बजावला.


कणकवलीत कडक बंदोबस्तात मतदान; निकालाकडे लक्ष

नगरपंचायत निवडणूक; दुपारी दीडपर्यंत ५२.८८ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ ः कणकवली नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी आज सकाळी साडेसात‍यापासून शांततेत मतदान सुरू झाले. सकाळी दहापर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्‍यामुळे मतदारांसह उमेदवारांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला नाही. दुपारी दीडपर्यंत सरासरी ५२.८८ टक्के मतदान झाले होते.
शहरातील सर्वच मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शहरातील विविध मतदान केंद्रांचा आढावा अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनीही घेतला. शिवाय पालकमंत्री नीतेश राणे यांनीही शहरातील सर्व मतदान केंद्राबाहेरील भाजपच्या बुथवर जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिवाय भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि शहर आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्याकडून सातत्याने सर्वच मतदान केंद्रांवरील स्थितीचा आढावा घेतला जात होता. शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा संघटक सतीश सावंत यांनीही शहरातील विविध बुथला भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

कणकवलीत यंदा भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. या दोन्ही पक्षांतर्फे मतदारांना घर ते मतदान केंद्र आणि मतदान केंद्र ते पुन्हा घरापर्यंत ने-आणची व्यवस्था केली होती. दरम्‍यान, शहरातील विद्यामंदिर हायस्कूलच्या मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात दुचाकीसह अन्य वाहने आणण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला होता. त्‍यामुळे या मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रात येण्यासाठी पायपीट करावी लागली.
आज सकाळच्या सत्रात ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शाळा क्र.५ येथे मतदान केले. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी विद्यामंदिर हायस्कूल तर भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी शाळा क्र.३ येथे आपला मतदानाचा हक्‍क बजावला. नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शहर विकास आघाडीच्या नेत्‍यांनी एकमेकांवर आरोप प्रत्‍यारोप केले. त्‍यामुळे प्रत्‍यक्ष मतदानावेळी वातावरण तंग होण्याची शक्‍यता होती. त्‍यादृष्‍टीने मतदान केंद्राबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनीही शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्‍या होत्या. मात्र, दुपारपर्यंत शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू होते. आघाडी आणि भाजप पक्ष कार्यकर्त्यांचे बूथ समारोसमोर असूनही कार्यकर्त्यांमध्ये वादंगाचे प्रकार झाले नव्हते.
दुपारच्या सत्रातही मतदान केंद्रांवर गर्दी होती. तर थेट लढत असल्‍याने कुठला उमेदवार जिंकणार याबाबतचीही चर्चा होती. यंदा दुरंगी लढती असल्‍याने प्रत्‍येक मताला महत्‍व प्राप्त झाले आहे. त्‍यामुळे घराघरातील प्रत्‍येक मतदाराने मतदानाचा हक्‍क बजावावा यासाठी विशेषतः कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत वाहनातून ने-आण करण्यासाठी धडपडताना दिसले.
दरम्यान काल (ता.१) रात्री दहा वाजता प्रचार संपला. त्यानंतर पहाटे पर्यंत विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी मतदारांच्या घराघरांत पोहचत होते. सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच प्रभागातील मतदारांना आणण्यासाठी तीन आसनी रिक्षा, मोटारी आदींचा वापर होत होता. कुठल्या वाडीतील कुणी मतदान केले आणि कोण शिल्लक आहेत. याचीही खातरजमा केली जात होती. निवडणुकीबाबत कार्यकर्त्यामध्ये कमालीचा जोष होता. नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत शहरवासीयांना निकालाची उत्‍सुकता लागून राहिली आहे.
-------------------------
राणे यांचे तेली, सावंतांशीही हस्तांदोलन
पालकमंत्री नीतेश राणे यांनी शहरातील विद्यामंदिर हायस्कूल बाहेरील भाजपच्या बुथला भेट दिली. या बुथसमोरच शहर विकास आघाडीचा बुथ लावला होता. त्‍या बुथवर शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली, ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत उपस्थित होते. मंत्री राणे हे भाजपच्या बुथवर जात असताना त्‍यांनी तेली आणि श्री.सावंत यांच्याशी हस्तांदोलन केले. त्‍यामुळे दोन्ही बूथवरील कार्यकर्तेही काही काळ गोंधळले होते.
----------
07964
आधी मतदान, नंतर सप्तपदी!
कणकवली शहरातील प्रभाग १३ मधील मतदार श्रद्धा शिवाजी परब यांचा आज विवाह सोहळा होता. त्‍यांनी विवाहाच्या विधी सुरू होण्याआधीच शहरातील विद्यामंदिर हायस्कूलमधील मतदान केंद्र गाठले. तेथे मतदानाचा हक्‍क बजावल्‍यानंतर त्‍या विवाह सोहळा असलेल्‍या मंगल कार्यालयात रवाना झाल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com