रेल्वे सुरक्षेसाठी ऑन द स्पॉट कॅश अॅवॉर्ड

रेल्वे सुरक्षेसाठी ऑन द स्पॉट कॅश अॅवॉर्ड

Published on

रेल्वेसुरक्षेसाठी जागेवरच रोख पारितोषक
सहा महिन्यात पाचजणांचा सन्मान; धोक्यांची सूचने तात्काळ उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः कोकण रेल्वेमार्गावर कार्यरत कर्मचारी रेल्वेच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात, हे लक्षात घेऊन त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने जागेवरच रोख पारितोषक ‘ऑन-दी-स्पॉट कॅश अॅवॉर्ड’ उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये गेल्या सहा महिन्यांत ‘कोरे’ने पाच जणांचा सन्मान केला आहे.
कोरेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या पुढाकाराने विशेष पुरस्कार सुरू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून तत्काळ अहवाल देणे आणि सुरक्षाधोक्यांवर तातडीने प्रतिसाद देण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. रेल्वेचे परिचालन आणि प्रवासी सुरक्षेबद्दल केआरसीएलची असलेली अतूट बांधिलकी यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत कोकण रेल्वेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कता दाखवत अनेक संभाव्य धोके वेळेत ओळखून त्यावर उपाययोजना केल्या. कर्मचाऱ्यांच्या या त्वरित प्रतिसादामुळे मोठे अपघात टळले आणि रेल्वेचे कामकाज विनाअडथळा सुरू राहिले. अशी कामे करणाऱ्यांमध्ये सावंतवाडी रोड- झाराप विभागातील पी. व्ही. राऊळ यांनी क्रॉसिंग स्टॉक रेलमधील बिघाड शोधला होता. त्यामुळे मोठा रूळ अपघात टळला. त्यांना १५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. तांत्रिक चूक वेळीच लक्षात आल्यामुळे कणकवली स्थानकावरील दुर्घटना टळली होती. स्टेशनमास्तर सुविधा स्वामी आणि पॉईंट्समन नारायण नेमलेकर यांनी रो-रो गाडीच्या रॅकेची लटकलेली पाईप त्वरित कळवली होती. त्यांचा प्रत्येकी १ हजार रुपये देऊन गौरव केला गेला. प्रवाशांचे प्राण वाचवणारे आरपीएफ कर्मचारी रणजीत सिंग आणि महेंद्र पाल तसेच अधिकृत विक्रेता वीर सिंग यांचा प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन सन्मान केला गेला. ही घटना रत्नागिरी रेल्वेस्थानकावर घडली होती. धावत्या ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या प्रवाशाला त्यांनी समयसूचकता दाखवत वाचवले होते. बोगद्यात रेल्वेरूळाला गेलेला तडा शोधून काढल्याबद्दल उक्षी-भोके विभागातील ट्रॅकमन पी. एल. सावंत यांचा १० हजार रुपये देऊन सन्मानित केले. बोगद्याच्या आतमध्ये रेल्वेरूळाला असलेला तडा वेळीच शोधून काढला आणि संबंधित टीमला कळवले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली तसेच ठाणे रेल्वेस्थानकावर तुतारी एक्स्प्रेस टीटीई संदेश चव्हाण यांनी एका संशयिताकडून एका मुलाची सुटका करून केली. या संवेदनशील कार्यासाठी त्यांना १५ हजार रुपयांचा पुरस्कार दिला गेला.
------
कोट
कर्मचाऱ्यांच्या सन्मानामुळे कोकण रेल्वेच्या फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांची सुरक्षा जपण्यातील महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यांची ही बांधिलकी आणि दक्षता केवळ प्रवाशांचीच नव्हे तर रेल्वेच्या मालमत्तेचेही संरक्षण करते तसेच इतरांनाही उच्चस्तरावर सतर्क राहण्याची प्रेरणा देते. कोकण रेल्वे व्यवस्थापन भविष्यातही अशाच कौतुकास्पद कृतींचा गौरव करत राहील आणि सुरक्षित व विश्वसनीय रेल्वे कार्यान्वयनासाठी एक मजबूत सुरक्षाप्रणाली तयार करण्यासाठी वचनबद्ध राहील.
--सुनील नारकर, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com