सिंधुदुर्गात निकालाची उत्कंठा शिगेला
लोगो ः पालिका, नगरपंचायत निवडणूक
-------
सिंधुदुर्गात निकालाची उत्कंठा शिगेला
राजकारणाचे अंतरंग; बहुसंख्य ठिकाणी बहुरंगी सामने
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः जिल्ह्यात चारही ठिकाणी झालेल्या पालिका, नगरपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्खंठा शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात ५७,२०७ पैकी ४२,२२४ जणांनी हक्क बजावला आहे. प्रमुख पक्षांनी विजयासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या निती वापरल्याने याचा परिणाम काय होणार? या संदर्भात त्यांचे नेतेही संभ्रमात आहेत. बहुसंख्य ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी आणि नगरसेवक पदांसाठी बहुरंगी लढती होतील अशी शक्यता आहे.
कणकवली नगरपंचायत आणि वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मतमोजणी आज अपेक्षीत होती; मात्र न्यायालयाच्या निकालामुळे ती २१ डिसेंबरपर्यंत पुढे गेली आहे. सहाजीकच निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत सत्तेतील शिवसेना आणि भाजप हे पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने निवडणुकीची समिकरणे बदलल्याचे चित्र होते. सगळ्याच पक्षांनी विजयासाठी पूर्ण ताकद लावली. असे असले तरी काही अपवाद वगळता मतदान या आधीच्या निवडणुकीसारखेच सर्वसाधारण प्रमाणात झाले आहे. सहाजीकच निकालानंतर काय समिकरणे समोर येणार याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. शहरवार राजकीय समिकरणे पाहता बऱ्याच ठिकाणी चुरशीच्या लढती अपेक्षीत आहे.
कणकवलीत दुरंगी
कणकवली नगरपंचायतीच्या १७ प्रभागात चुरशीने मतदान झाले. येथे १३,२७८ पैकी १०,५८४ जणांनी हक्क बजावला. शेवटच्या टप्प्यात मतदानाची आकडेवारी चांगली होती. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे आणि संदेश पारकर यांच्यात चुरस आहे. भाजपला शह देण्यासाठी येथे दोन्ही शिवसेना एकवटल्या होत्या. अर्थात शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांचे संघटनात्मक बळ शहरविकास आघाडीकडे काही प्रमाणात कमी पडल्याचे चित्र होते. असे असले तरी एकास एक लढाई असल्याने चुरस कायम राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेषः नगरसेवक पदांसाठी झालेल्या लढती राजकीय अंदाजाच्या पलिकडे गेल्या आहेत.
............................
मालवणात काय होणार?
मालवण पालिकेसाठी दोन्ही शिवसेना आणि भाजप यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत होती. अर्थात यंत्रणेच्या पातळीवर शिंदे शिवसेना आणि भाजप यांची ताकद जास्त होती. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत या दोघांमध्येच होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी नगरसेवक पदासाठीच्या लढतींचे रंग वेगळे आहेत. काही प्रभागामध्ये बहुरंगी लढती झाल्या आहेत. उमेदवाराच्या व्यक्तीगत प्रभावावरही निकाल झुकेल अशी शक्यता काही ठिकाणी आहे. त्यामुळे नगरसेवक पदाचे संख्याबळ कोणत्याच एका पक्षाकडे खूप मोठ्या संख्येने जाईल असे चित्र सध्यातरी नाही.
...........................
वेंगुर्ल्यात तिरंगी
वेंगुर्लेत भाजपतर्फे दिलीप गिरप, शिंदे शिवसेनेतर्फे नागेश गावडे आणि काँग्रेसचे विलास गावडे यांच्यात मुख्य लढत होती. सुरूवातीला भाजप आणि शिंदे शिवसेना यांचीच जास्त प्रमाणात वातावरण निर्मिती दिसत होती. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या विलास गावडे यांनीही प्रचार आणि मतदारांच्या संपर्काबाबत जोरदार कमबॅक केले. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचेही त्यांना पाठबळ मिळाले. याच्या जोरावर झालेल्या वातावरण निर्मितीचा विचार करता नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होईल असा अंदाज आहे. नगरसेवक पदांसाठी मात्र बहुसंख्य ठिकाणी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातच मुख्य लढत होत आहे. ठाकरे शिवसेनेनेही काही भागात चांगली वातावरण निर्मिती केली आहे.
.........................
सावंतवाडीत प्रतिष्ठा पणाला
सावंतवाडी पालिकेसाठी शिंदे शिवसेना आणि भाजप यांनी मोठी ताकद पणाला लावली. शिवसेनेतर्फे आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने राजघराण्यातील श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी देत या स्पर्धेत मोठी चुरस आणली. पालकमंत्री नीतेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा येथील निवडणुकीत सक्रिय सहभाग होता. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची खरी लढत भाजप आणि शिंदे शिवसेनेत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. ठाकरे शिवसेनेने सिमा मठकर यांच्या रुपाने चांगला उमेदवार दिला होता; मात्र ते यंत्रणा राबविण्यात इतरांच्या तुलनेत कमी पडले. येथे नगरसेवक पदासाठीही लक्षवेधी लढती होत आहेत. बऱ्याच ठिकाणी दोन्ही शिवसेना आणि भाजप अशा तिरंगी लढतींची शक्यता आहे.
......................
शहर*एकूण मतदार*झालेले मतदान*टक्केवारी
सावंतवाडी*19429*13475*69.36
मालवण*14385*10651*74.06
वेंगुर्ले*10115*7514*74.29
कणकवली*13278*10584*79.71
.....................
कोट
जिल्ह्यात तीन पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी (ता.२) मतदान झाले. या प्रक्रियेत वाढलेला मतदानाचा आकडा हा भाजप पक्षासाठी पोषक ठरणारा आहे. भाजपने मतदारांसमोर विकासाचे व्हिजन ठेवून मतदान मागितले होते. त्यामुळे प्रचारात मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. परिणामी चारही स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला यश मिळेल.
- प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप
...................
कणकवली नगरपंचायतीत आम्ही शहर विकास आघाडी म्हणून सामोरे गेलो होतो. यामध्ये ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, काँग्रेसचा समावेश होता. शहरातील मतदार आमच्या बाजूने होते. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलो होतो. मतदारांचा प्रतिसादही मोठा मिळाला होता. तिन्ही पक्षाचे नेते प्रचारात उतरले होते. यामुळेच कणकवलीतील मतदानाचा आकडा वाढला आहे. हा वाढलेला आकडा आमच्या बाजूने आहे. निकाला दिवशी शहर विकास आघाडीलाच यश मिळाल्याचे दिसेल.
- संदेश पारकर, जिल्हाप्रमुख, ठाकरे शिवसेना
....................
मालवण पालिकेत आमदार नीलेश राणे यांनी मतदारांना पुढील पाच वर्षांत करण्यात येणार विकास मांडला आहे. तसेच कोणत्या मुद्यांना आधारून विकास केला जाणार आहे, हे सुद्धा स्पष्ट केले आहे. तसेच आमच्या सर्व उमेदवारांनी भ्रष्टाचार न करण्याची घेतलेली शपथ आणि निष्कलंक, प्रामाणिक उमेदवार यामुळे शिवसेनेला प्रचारात मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे शहरात झालेले रेकॉर्ड ब्रेक मतदान हे शिवसेनेच्या बाजूनेच राहणार आहे. याशिवाय शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता पूर्ण वातावरण आमच्या बाजूने होते. त्यामुळे मालवणमध्ये नक्की यश मिळेल.
- दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना
...................
सावंतवाडी, वेंगुर्लेतील जनता शिंदे शिवसेनेच्या बाजूने होती. आमदार दीपक केसरकर यांच्यावर येथील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचाच विजय होणार आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर मतदारांना मतदानाचे आवाहन केले होते. मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारांनाही याची जाणीव होती. या विधानसभेतील जनतेने कायम विकासाला महत्व दिले आहे. त्यामुळे विजयाचा १०० टक्के विश्वास आहे.
- संजू परब, जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

