मतदानातील वाढ अस्वस्थता वाढवणारी
मतदानातील वाढ अस्वस्थता वाढवणारी
देवरूखमधील स्थिती ; नेमकी संधी मिळणार कोणाला?
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ३ ः देवरूख नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासह १७ प्रभागासाठी काल (ता. २) मतदान झाले. यंदा मतदानात झालेली वाढ ही उमेदवारांची अस्वस्थता वाढवणारी आहे. मतदार विरोधकांना संधी देणार की, सत्ताधाऱ्यांना तारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ला मतमोजणी असल्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.
देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर शह काटशह करत आपले प्रस्थ अबाधित ठेवण्यासाठी छुपे राजकीय डावपेच खेळले गेल्याची चर्चा रंगलेली आहे. प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला राखीव जागा आरक्षित असल्यामुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीकडून पुन्हा भाजपच्याच मृणाल शेट्ये यांना उमेदवारी दिली तर उबाठा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व वंचित बहुजन महाआघाडीच्या सबुरी थरवळ मैदानात उतरल्या होत्या. शहर आघाडीच्या स्मिता लाड या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. आप-गावविकास आघाडी युतीच्या दीक्षा खंडागळे ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित चेहरा म्हणून निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या अपक्ष उमेदवार वेदिका मोरे यांच्याकडे उच्चशिक्षित युवकांचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. या पंचरंगी लढतीत देवरूखमधील जनता कोणाला कौल देणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आठ वर्षांच्या कारकिर्दीतील काळात शहरात घनकचरा प्रकल्प, सुसज्ज प्रशासकीय इमारतीची सुरू असलेली कामे, भविष्यातील पाणी नियोजनासाठी धरण व विस्तारीत नळपाणी पुरवठा योजना, अग्निशमन यंत्रणा, जनतेच्या साथीने स्वछता अभियानांतर्गत मिळवलेला राज्यात प्रथम क्रमांक, वाडीवस्तीवर गटारांची सुविधा, पथदीप योजना आदी कामांच्या जोरावर महायुती रिंगणात उतरलेली होती तर प्रशासकीय कारकिर्दीत विकासकामांवर आणि नगरपंचायतीच्या प्रशासनावर अंकुश ठेवण्यात आलेले अपयश, रखडलेला विकास आराखडा अशा बाबी अधोरेखित करत विरोधकांनी राळ उठवली होती. सर्व बाजूंनी निवडणुकीत ताकद पणाला लागलेली आहे.
------
चौकट
असे झाले मतदान
देवरूख नगरपंचायतीत ७४.३३ टक्के मतदान झालेले होते. एकूण मतदान ८ हजार २० इतके झाले असून, ४ हजार २५ महिला व ३ हजार ९९५ पुरुष मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. १ मध्ये ८३ टक्के तर प्रभाग १६ मध्ये ८३.४ टक्के झाले. सर्वात कमी मतदान प्रभाग ७ आणि १३ मध्ये ६४.६ आणि ६४.९ टक्के इतके झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

