संगीत श्रवणामुळे सकारात्मक उर्जा

संगीत श्रवणामुळे सकारात्मक उर्जा

Published on

swt47.jpg
08415
सावंतवाडीः ‘जीवन संगीत गुरुकुल’ कार्यक्रमात डॉ. संतोष बोराडे यांनी मार्गदर्शन केले.

संगीत श्रवणामुळे सकारात्मक उर्जा
डॉ. संतोष बोराडेः सावंतवाड़ीत ‘जीवन संगीत गुरुकुल’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः मानवी जीवन हे ताणतणावांनी भरलेले आहे. लहानपणापासून आपल्याला अनेक प्रकारचे ताण सतावत असतात. अनेकदा हे ताण कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे संगीत ऐकणे होय. संगीत ऐकल्याने माणसाच्या मनावरील ताण कमी होऊन मानसिक त्रासही कमी होतो. म्हणून जीवनात संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संगीत ऐकल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन म्युझिक थेरपिस्ट डॉ. संतोष बोराडे यांनी येथे केले.
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत व रोटरी क्लबचे अनंत उचगावकर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग समता सप्ताह निमित्ताने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे ‘जीवन संगीत गुरुकुल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बोराडे यांनी मार्गदर्शन केले. 
डॉ. बोराडे म्हणाले, ‘‘संगीताचे नानाविध प्रकार आहेत. बालपणापासून ते मोठे होण्यापर्यंत आपण विविध गीतांमधून संगीत ऐकले आहे. आनंद, राग, भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. मन मोकळे करण्यासाठी संगीताचा वापर केल्यास आपल्यावर आलेला ताणतणाव निश्चितपणे दूर करता येऊ शकतो. माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात आहे. आईचे अंगाई गीत, आपण म्हटलेली कविता, आपल्याला आवडलेली गाणी, पारंपरिक लोकगीते हे सुद्धा संगीतच आहे. संगीतामधून माणसाला चांगल्या-वाईट गोष्टी स्वीकारण्याची शक्ती मिळते.’’
प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी ‘जीवन संगीत गुरुकुल’ या कार्यक्रमाचे उद्देश व हेतू विशद केला. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक प्रा. सतीश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे खजिनदार सी. एल. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा. जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. सविता माळगे, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. रणजित राऊळ, प्रा. पवन वनवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. माया नाईक, प्रा. स्पृहा टोपले, प्रा. नीलेश कळगुंटकर, प्रा. राहुल कदम उपस्थित होते. प्रा. मिलिंद कासार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. केदार म्हसकर यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com