कोयनेचे दोन टप्पे तीन महिने बंद राहणार

कोयनेचे दोन टप्पे तीन महिने बंद राहणार

Published on

कोयनेचे दोन टप्पे तीन महिने बंद
चिपळूणसह अनेक गावात पाणीटंचाई; बोगदा दुरुस्तीसाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे चिपळूणसह अनेक गावांना तीन महिने पाणीटंचाई जाणवणार आहे. खेर्डी, खडपोली आणि लोटे एमआयडीसीलासुद्धा टंचाईची झळ बसणार आहे.
कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या टप्पा एक आणि दोनला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. गळती दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोयना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यानी गेल्या महिन्यात दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. सह्याद्रीच्या डोंगरातील बोगदा सुमारे ३०० फूट खोल आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची होती. त्यामुळे टप्पा एक आणि दोनला होणारा पाणीपुरवठा सुमारे पाच दिवस बंद केला होता. त्यावेळी पोफळी कोंडफणसवणे, शिरगाव, तळसर, मुंडे या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर ते पुढील तीन महिने चालणार आहे. त्यामुळे तीन महिने कोयना धरण आणि कोळकेवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
कोयना धरणातून येणारे पाणी प्रथम टप्पा एक आणि दोनमध्ये घेतले जाते. तेथे वीजनिर्मिती केल्यानंतर ते पाणी चौथा टप्प्याकडे सोडले जाते. चौथ्या टप्प्यात वीजनिर्मिती झाल्यानंतर ते पाणी कोळकेवाडी धरणात आणले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. तेथे वीजनिर्मिती केल्यानंतर कोयनेचे पाणी कालव्याद्वारे वाशिष्ठीमध्ये सोडले जाते. वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे कोयनेचे अवजल उचलण्यासाठी चिपळूण नगरपालिका आणि एमआयडीसीने नदीलगत जॅकवेलची उभारणी केली आहे. पोफळी परिसरातील पाच गावांना इव्हिटीमधून पाणी दिले जाते. आता दुरुस्तीचे काम सुरू केल्यानंतर इव्हिटीत येणारे पाणी बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी पर्यायी व्यवस्था करावी असे पत्र महानिर्मिती कंपनी, जलसंपदा विभागाने ग्रामपंचायतींना यापूर्वी पाठवले आहेत. मात्र ठोस उपाययोजना कोणत्याही ग्रामपंचायतीने केलेली नाही. गावातील जुन्या विहिरी उपसण्याचे काम सध्या काही ठिकाणी सुरू आहे. कोळकेवाडी धरणातून पाण्याची नवीन लाईन प्रकल्पग्रस्त पाच गावांसाठी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती, परंतु ती खर्चिक असल्यामुळे तो प्रस्तावही मागे पडला आहे. त्यामुळे बोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर पाण्याची मोठी टंचाई जाणवणार आहे.

कोट
दुरुस्तीच्या काळात कोयना प्रकल्प पूर्णपणे बंद राहणार नाही. चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती होईल ते पाणी कोळकेवाडी धरणात आणले जाईल. हे पाणी किती असेल निश्चित सांगता येत नाही. नगरपालिका, ग्रामपंचायती किंवा एमआयडीसीच्या मागणीनुसार कोयनेची वीज निर्मिती करता येत नाही. त्यासाठी महानिर्मितीच्या वरिष्ठ कार्यालयातून आदेश यावा लागतो. त्यामुळे कोयनेच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांनी पाण्याचा साठा करणे, तसेच पर्यायी व्यवस्था करणे हाच उपाय आहे.
- महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग


कोयना प्रकल्पाच्या बोगद्याची दुरुस्ती करताना शंभर टक्के प्रकल्प बंद ठेवू नये, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. किमान सकाळ आणि संध्याकाळी विजेची मागणी जास्त असते तेव्हा प्रकल्प चालू ठेवावा म्हणजे वाशिष्‍ठी नदीला पाणी येईल आणि ते आम्हाला उचलता येईल.
- रोहित खाडे, पाणीपुरवठा अधिकारी, चिपळूण पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com