पावस जिल्हा परीषद गटात कुणबी फॅक्टर

पावस जिल्हा परीषद गटात कुणबी फॅक्टर

Published on

पावस गटात ‘कुणबी फॅक्टर’चा प्रभाव
इच्छुकांची मोर्चेबांधणी ; तिरंगी लढतीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ ः नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका पार पडल्या असून, लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटात विविध पक्षाच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सद्यःस्थितीत तिरंगी लढतीची शक्यता असून, या वेळी कुणबी फॅक्टरवर सर्वकाही अवलंबून राहणार आहे.
पावस गटात २०१७ मध्ये शिवसेनेच्या आरती तोडणकर निवडून आल्या. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यामुळे अनेकजण शिंदे शिवसेनेत सामील झाले. २०१२ मधील निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार आमनेसामने आल्यामुळे बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नंदकुमार मोहिते निवडून आले तसेच शिवसेनेकडून उभे राहिलेल्या उमेदवाराने आपला निवडणुकीचा खर्च न दिल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडणूक लढवता आली नाही. शिवसेनेतर्फे आरती तोडणकर यांनी भाजपचे विनायक भाटकर यांचा पराभव करत विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाज व बौद्ध मते ठाकरे गटाला मिळाली होती. ती मते आपल्याकडे राखण्यासाठी या निवडणुकीत प्रयत्न राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीत शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांच्यात युती झाली होती. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही युती निश्चित मानली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे पावस गट भाजपकडे राहण्याची शक्यता आहे; परंतु स्थानिक पातळीवर युती न झाल्यास शिंदे गट स्वतंत्र उमेदवार उभा करू शकतो. या गटात पारंपरिक कुणबी समाजाची मते सर्वाधिक आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे कुणबी फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. कुणबी समाज कोणाची पाठराखण करणार, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे तसेच २०१७ च्या निवडणुकीमध्ये कुणबी समाजाचे नेतृत्व करणारे सचिन गिजबिले यांनी निवडणूक लढवली होती.
----
कोट १
जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे गेली अनेक वर्षे प्राबल्य आहे. त्यामुळे प्रत्येक गावागावांमध्ये शिवसेना रुजलेली आहे. अनेक निष्ठावंत शिवसैनिक आजही ठाकरेंच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी दिलेला उमेदवार निवडून आणण्याच्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता तन-मन-धनाने प्रयत्न करत आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावात निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.
- नीलेश गजने, ठाकरे शिवसेना
---
कोट २
पावस गटामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याच्यादृष्टीने जिजाऊच्या माध्यमातून समाजाला एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून निवडणुकीमध्ये उतरून आपल्या समाजाचा आवाज जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
- संजय नैकर, जिजाऊ संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com