रत्नागिरीत रविवारी राष्ट्रीय संविधान परिषद
रत्नागिरीत उद्या राष्ट्रीय संविधान परिषद
संविधान जागर विचारमंच ; उद्घाटक डॉ. नरेंद्र जाधव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरीत रविवारी (ता. ७) राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही परिषद होणार आहे.
परिषदेचा प्रारंभ सकाळी ८.३० ते १० वा. संविधान दिंडीने होणार असून, परिषदेचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, माजी खासदार व संविधान अभ्यासक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार असून, मुंबई उच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या प्रसंगी डॉ. जाधव ‘मी भारतीय नागरिक आणि संविधान’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
या समारंभात संविधानिक मुल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांना पहिला ‘राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार २०२५’ देऊन गौरवण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुनीता गायकवाड (भारतीय संविधान आणि महिला सबलीकरण), प्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे (समाजातील तळागाळापर्यंत खरोखरच संविधान पोहोचले आहे का?) आणि सायंकाळी ४ वा. समारोप समारंभात विचारवंत, वक्ते संजय आवटे (भारतीय संविधान : काल, आज आणि उद्या) अशा संविधानविषयक विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परिषदेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय कांबळे आणि परिषदेचे आयोजक प्रा. डॉ. शाहू मधाळे आदींनी केले आहे.

