शून्य शिक्षकी शाळा बंद होऊ देणार नाही
शून्य शिक्षकी शाळा बंद होऊ देणार नाही
राजापुरात संस्थाचालकांची बैठक; तीन जिल्हे वगळण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः शाळांच्या जमिनी घशात घालण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी संचमान्यतेनुसार शून्य शिक्षकी शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. हे कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार राजापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे.
सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संचमान्यताबाबतची माध्यमिक शाळामधील पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी स्थगिती दिली असल्याने समायोजन प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यामुळे माध्यमिक शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळाला; मात्र टांगती तलवार अद्यापही कायम आहे. यामुळे तालुक्यातील संस्थाचालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची दिशा ठरवण्यासाठी संचालकांची बैठक ओणी येथे घेण्यात आली. या वेळी शिक्षक समायोजनाबाबत चर्चा करण्यात आली. अनेक शाळांमध्ये वर्गसंख्येपेक्षा शिक्षकसंख्या कमी आहे. परिणामी, विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून सोडाच तर सामान्य शिक्षणापासूनसुद्धा वंचित होत आहेत. हा उघडपणे कायद्यायातील तरतुदींचा तसेच उद्देशांचा भंग होत असल्याचे सांगण्यात आले. २०२४-२५च्या संचमान्यतेनुसार, अतिरिक्त शिक्षक समायोजना राबवण्यात येत असून, याची माहिती देण्याचे आदेश दिले होते. यामुळे कोकणातील माध्यमिक शाळांमध्ये खळबळ उडाली होती. शासनाच्या या निर्णयामुळे शून्यशिक्षिकी शाळा बंद होणार असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
चौकट
ग्रामपंचायतीत विरोधाचा ठरावाचा निर्णय
या वेळी गावागावामध्ये व पालकांमध्ये जनजागृती करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खास ग्रामसभा आयोजित करूत विरोधात ठराव करण्याचे ठरवण्यात आले. शासनाकडे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे अतिडोंगराळ विभागात येत असून, शासनाने नव्या संचमान्यतेमधून वगळण्यात यावेत, अशी मागणी करण्यात यावी. जिल्हा समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.

