दाभोळ खाडीतील प्रदूषणाच्या सर्वेक्षणाला सुरवात
- ratchl५१.jpg-
२५O०८६२७
चिपळूण ः दाभोळखाडीत पाहणी करताना केंद्रीय पथकाचे अधिकारी.
----
दाभोळ खाडीत प्रदूषण अभ्यासाला वेग
वाघिवरे-तुंबाडदरम्यानचे घेतले नमुने; माशांवर होणारा परिणाम तपासणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः केंद्र सरकारच्या सेंट्रल इनलॅण्ड फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे दाभोळ खाडीतील प्रदूषणाचा अभ्यास केला जात आहे. या संस्थेच्या पथकाने दाभोळ खाडीत गेल्या आठवडाभरात वाघिवरे ते तुंबाडदरम्यान खाडीत ठिकठिकाणी वेगवेगळे नमुने घेतले आहेत. या अभ्यासातून पाण्यातील रासायनिक घटक, विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा, जड धातूंची उपस्थिती तसेच त्यांचा माशांचा आरोग्यांवर होणारा परिणाम तपासला जाणार आहे.
लोटे एमआयडीसीतील सांडपाणी सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया करून ते दाभोळ खाडीला सोडले जाते; मात्र खाडीत सातत्याने मासे मरण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. चिपळूण, खेड, दापोली आणि गुहागर अशा चार तालुक्यांतून दाभोळ खाडी वाहते. मासे मरण्याच्या घटना सातत्याने घडल्याने यावर शात्रोक्त सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला. त्यानुसार भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत सेंट्रल इनलॅण्ड फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटवर याची जबाबदारी सोपवली आहे. ही संस्था देशातील मासेमारीच्या विविध पैलूंवर संशोधन करत आहे. पावसाळ्यापूर्वी देखील या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी खाडीतील पाण्याचे नमुने घेतले होते. त्यानंतर पुन्हा या संस्थेने खाडीचा अभ्यास सुरू केला आहे. पावसाळा आणि पावसाळ्यानंतरची परिस्थिती या दोन्ही बाबींचा अभ्यास सखोलपणे केला जात आहे. या पाहणीचा अहवाल चार महिन्यात दिला जाणार असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले. या अहवालानंतरच रासायनिक सांडपाण्याचा दाभोळ खाडीतील जीवसृष्टीवर कितपत परिणाम झाला, ते पुढे येणार आहे. तुंबाड जेटी येथे पाण्याचे नमुने घेताना संस्थेच्या पथकासोबत दाभोळ खाडी परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, उपाध्यक्ष अरुण पडवळ, नितीन सैतवडेकर, विजय जाधव यांच्यासह बहिरवली व तुंबाड ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
भोई समाजाचा निकराचा लढा
या खाडीवर शेकडो मच्छीमारांचा उदरनिर्वाह गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. रासायनिक सांडपाण्याचा खाडीतील मासेमारीवर मोठा परिणाम होत असल्याने येथील भोई समाजाने निकराचा लढा दिला; मात्र खाडीतील प्रदूषणाची समस्या अद्याप सुटलेली नाही.

