मुणगे नळपाणी योजनेचे काम बंद
मुणगे नळपाणी योजनेचे
काम बंद, ग्रामस्थांचे हाल
लोकप्रतिनिधींच्या अनास्थेबाबत संताप
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ५ ः येथील नळपाणी पुरवठा योजनेचे काम निधीअभावी बंद असल्यामुळे नळधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे पाठपुरावा होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मुणगे व आडबंदर नळपाणी पुरवठा योजनेचे काम ८ फेब्रुवारी २०२३ ला मंजूर झाले असून काम पूर्ण करण्याची मुदत २८ फेब्रुवारी२०२४ पर्यंत होती, परंतु मुदत संपुन दहा महिने होत आले तरी ठेकेदारामुळे अद्यापही हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. या योजनेसाठी पोयरे येथील विहिरीतून पंपाद्वारे पाणी गावामध्ये आणले जाते. पोयरेते मुणगेपर्यंत टाकण्यात आलेली नळपाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्याने नळधारकांना वारंवार पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यानुसार पाईपलाईन नवीन करण्याची मागणी करण्यात आली. या योजनेसाठी मुणगे गावासाठी जलजीवन मिशन योजनेमधून १ कोटी ८७ लाख, तर आडबंदर महसुली गावासाठी १ लाख २४ हजार एवढा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे काम ठेकेदाराकडून ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात आले. भगवती हायस्कूल तिठा येथील पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईनसाठी चर खोदण्याचे काम सुरू करून वर्ष होत आले तरी अद्यापही ते अपूर्ण अवस्थेत आहे. पाईपलाईनच्या या चरामुळे भगवती हायस्कूलकडे जाणारा रस्ता तसेच कॉलेजकडे जाणाऱ्या रस्ता धोकादायक बनला आहे.
दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वाढवून ती दुप्पटीपेक्षा अधिक केली. तरीही पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने बऱ्याच नळधारकांनी कनेक्शन बंद केली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नळधारकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विविध कारणांमुळे जलजीवनच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे. शासन पाण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च करत आहे, परंतु लोकप्रतिनिधींनीच्या अनास्थेमुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
.......................
कोट
नळपाणी पुरवठा योजनेचे पाईप पोयरे येथे वारंवार फुटतात. जलजीवनच्या ठेकेदारांना जुनी कार्यरत असलेली पाईपलाईन दुरुस्ती करून देण्यास सांगितले, परंतु त्यासाठी होणारा खर्च दिला काम करणार असल्याचे सांगून त्याने काम नाकारले. सुधारीत आराखड्याला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत नळपाणी पुरवठा होणार नाही; मात्र देवी भगवती यात्रोत्सवापूर्वी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून तातडीने नळपाईप लाईन दुरुस्त करण्यात येईल.
- अंजली सावंत, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

