हर्णै बंदरातील नव्या जेटीमुळे मच्छीमार हैराण

हर्णै बंदरातील नव्या जेटीमुळे मच्छीमार हैराण

Published on

-rat५p११.jpg-
२५O०८६००
दापोली ः पौर्णिमा असल्याने काल (ता. ४) सायंकाळी ४ वाजल्यानंतर ओहोटी लागल्याने या नौका गाळात रुतल्या होत्या.
---
‘हर्णै’तील नव्या जेटीमुळे मच्छीमार हैराण
गाळ साचल्याने नौका रुतण्याची समस्या वाढली ; उपाययोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ - कोकणातील मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकल्प राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्णै बंदरामध्ये तब्बल २५० कोटी रुपयांची नवी जेटी उभारण्याचे काम सुरू आहे; मात्र गेल्या आठ महिन्यांपासून हे काम ठप्प असून, स्थानिक मच्छीमारांच्या रोजच्या जलमार्गात अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
नवीन जेटीसाठी बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्यामुळे नौका थांबण्याच्या मुख्य चॅनलमध्ये गाळ साचत आहे. त्यामुळे मच्छीमारांना नौका उभ्या करणे आणि ये-जा करण्यामध्ये मोठी कसरत करावी लागत आहे.
समुद्रातील भरती-ओहोटीच्या चक्रामुळे महिन्यात दोनवेळा अमावस्या आणि पौर्णिमेला मोठे उधाण येते; परंतु ओहोटीला या गाळात नौका अक्षरशः अडकून बसतात. एकदा नौका रुतली की, पुढील भरती येईपर्यंत ती हलवणे शक्य होत नाही. त्यामुळे मच्छीमारांना तत्काळ समुद्रात जाता येत नाही आणि रोजच्या मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. महिन्यात किमान आठ दिवस तरी या समस्येला मच्छीमारांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. हर्णै बंदर हे दापोली तालुक्याचे मुख्य आर्थिक केंद्र मानले जाते. येथे रोज कोटींच्या वर मासळीची उलाढाल होते; मात्र सध्या समुद्रात वाढलेल्या अवैध मासेमारीमुळे मासळीची आवक घटली आहे. त्यातच जेटीच्या कामामुळे निर्माण झालेल्या नव्या अडचणींमुळे मच्छीमारांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अवैध मासेमारीमुळे आधीच उत्पन्न घटले आहे. त्यात नौका रुतण्याच्या समस्येमुळे रोज नव्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने मच्छीमारांमध्ये संतापाची भावना आहे.
बंदरविकासाची गरज मान्य आहे; मात्र कामामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेत अडथळे निर्माण होऊ नयेत हीच मच्छीमारांची अपेक्षा आहे. बंदर विभागाने स्थानिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, गाळ काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. योग्य नियोजन आणि संवाद झाला तर विकासकामांमुळे समुद्रावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना त्रास होणार नाही, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

चौकट...
योगेश कदम यांची जेटीला भेट
१५ दिवसांपूर्वी दापोलीचे आमदार व राज्यमंत्री योगेश कदम यांनी जेटीच्या कामाची पाहणी करून जेटीचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच करा तसेच सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश दिले होते.
---
कोट...
जेटीचे कामाला आमचा विरोध नाही; पण गाळ साचल्यामुळे नौका रूतून बसतात तेव्हा आमचे रोजचे आर्थिक नुकसान कोण भरून काढणार? महिन्यात ८-८ दिवस समुद्रात जाता येत नाही. आधी अवैध मासेमारीची समस्या, त्यात आता ही अडचण… अशा परिस्थितीत आम्ही या उद्योगात टिकून दाखवायचं तरी कसं? यावर बंदरखात्याने स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कामकाज करावे.
- प्रकाश रघुवीर, उपाध्यक्ष हर्णै मच्छीमार बंदर कमिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com