-...आता एसटीतून करा बिनधास्त महाराष्ट्र भ्रमंती

-...आता एसटीतून करा बिनधास्त महाराष्ट्र भ्रमंती

Published on

...आता एसटीतून करा महाराष्ट्र भ्रमंती
आवडेल तेथे प्रवास आणखी स्वस्त; प्रौढ, मुलांच्या पासमध्ये ५०० ते १ हजाराची सूट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवडेल तेथे प्रवास योजना सुरू केली. मध्यंतरी एसटीची भाडेवाढ तसेच या योजनेचे दर वाढल्यामुळे प्रवाशांची कमी पैशात महाराष्ट्र भ्रमंतीची संख्या घटली होती. याचाच विचार करून परिवहन महामंडळाने एसटीची आवडेल तेथे प्रयास योजना आणखी स्वस्त केली आहे. आता पुन्हा एकदा ४, ७ दिवसांच्या पाससमध्ये दर कमी केले आहेत. ५०० ते १००० रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणसह राज्यभरातील जे फिरस्ता, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आहेत त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन महाराष्ट्रात भ्रमंती करण्याची नवी संधी महामंडळांनी निर्माण करून दिली आहे.
राज्यमार्ग परिवहन महामंडळाने १९८८ मध्ये दहा दिवसांसाठी पास देत आवडेल तेथे प्रवास ही योजना सुरू केली. एप्रिल २००६ मध्ये योजनेची पुनर्रचना करण्यात आली. दहा दिवसाचा पास रद्द करत ४ आणि ७ दिवस पासचा समावेश करण्यात आला. पूर्वी ४ दिवसांच्या साध्या एसटीसाठी १८१४ रुपये दर होते ते आता १३६४ करण्यात आले तर मुलांसाठी ९१० होते ते ६८५ करण्यात आले. ७ दिवसासाठी जुने दर ३१७९ होते तर नवीन दर २३८२ रु., मुलांसाठी १५८८ होते तर नवीन दर ११९४ रु. करण्यात आले. शिवशाही, ई-बसेसमध्येही ५०० ते १००० रुपयांची सवलत देण्यात आली आहे.
शहर वाहतुकीसह राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीत एसटी ज्या ठिकाणी पोहोचते अशा सर्व ठिकाणांमार्फत पासची वैधता आहे. पासधारकांना आरक्षण करून प्रवासाची मुभा आहे. यासाठी स्वतंत्र आरक्षण शुल्क भरावे लागते. प्रौढ आणि मुलांसाठी वेगवेगळे दर आहेत. पासधारकांमध्ये तीर्थक्षेत्रासह पर्यटनस्थळांकडे विशेष भर आहे. कोकणातील गणपतीपुळे, विविध समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे यांसह विविध बाबी पाहण्यासाठी पर्यटक या योजनेचा वापर करतात तसेच इथले नागरिक तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मुंबई, पुणेसह विविध धार्मिक, पर्यटन ठिकाणी जातात. यासह सण-उत्सवात पासची मागणी वाढते. मध्यंतरी पासेसचे दर वाढल्यामुळे आवडेल तेथे प्रवास योजनेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती; मात्र आता पुन्हा एकदा पासेसचे दर कमी केल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांनो कमी पैशात महाराष्ट्रभर फिरायचे आहे तर मग आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ घेऊन आपण पर्यटन करू, हे निश्चित. पर्यटन करणाऱ्या प्रवाशांसाठी पर्वणीच आहे.
----
चौकट...
सेवाप्रकार* प्रौढ* मुले (४ दिवस)
साधी गाडी* १३४६* ६८५
शिवशाही* १८१८* ९११
ई-बस* २०७२* १०३८
----------------
सेवा प्रकार* प्रौढ* मुले (७ दिवस)
साधी* २३८२* ११९४
शिवशाही* ३१७५* १५९०
ई-बस* ३६१९* १८१२
---
कोट...
आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटक, प्रवाशांची याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त पासेस काढून घेऊन महाराष्ट्रभर भ्रमंती करावी.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

Marathi News Esakal
www.esakal.com