कोलझर पंचक्रोशी विकासाला पाठबळ
09135
कोलझर पंचक्रोशी विकासाला पाठबळ
मनीष दळवी : शेतकरी बागायतदार मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ७ : कृषी क्षेत्राच्या विकासाला सहकाराच्या माध्यमातून बळकटी देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे कायम सहकार्य असेल. कोलझर पंचक्रोशीच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने पाठबळ देऊ, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी शनिवारी (ता. ६) येथे दिली.
कोलझर सोसायटीतर्फे आयोजित शेतकरी बागायतदार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर झालेल्या या मेळाव्याला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री. दळवी म्हणाले, ‘आगामी काळात शेती क्षेत्रातूनच खरी प्रगती होणार आहे. यासाठी तुमच्याकडे असलेल्या जमिनी या खरे सोने आहे. त्या विकू नका. आधुनिक पद्धतीने शेती बागायती करून त्यातून आर्थिक उन्नती साधणे शक्य आहे. कोलझर पंचक्रोशीत यासाठी आवश्यक सर्वाधिक क्षमता आणि संपन्नता आहे. सहकाराच्या माध्यमातून या शेती बागायतीला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे आवश्यक सर्व मदत केली जाईल. यात सोसायटीची भूमिका महत्त्वाची असेल.’
ते म्हणाले, ‘सोसायटीतर्फे नव्या इमारतीसाठी जिल्हा बँकेकडून आवश्यक सर्व मदत तातडीने करू. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा. केवळ शेती, बागायती, सहकार याच्याही पलीकडे जाऊन या पंचक्रोशीतील सगळे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने पाठबळ देऊ. येथे पर्यटन, कृषी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करत या भागाच्या उन्नतीसाठी माझ्या वतीने शक्य तितके प्रयत्न करण्याची ग्वाही तुम्हाला यानिमित्ताने देत आहे.’
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, जिल्हा बँकेचे संचालक गणपत देसाई, सोसायटीचे अध्यक्ष सुदेश देसाई, उद्यान विद्या महाविद्यालयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. एम. एस. शेडगे, डॉ. आर. आर. राठोड, डॉ. वाय. सी. मुठाळ, जिल्हा बँक विकास अधिकारी संजय ठाकूर उपस्थित होते. यावेळी सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. दळवी यांच्यासह सोसायटीचे माजी अध्यक्ष रा. पु. सावंत, प्रवीण परब, विकास सावंत आदींसह ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई यांचा सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. बँकेचे संचालक श्री. देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात सोसायटी अध्यक्ष देसाई यांनी सोसायटीच्या आणि या परिसराच्या विकासासाठी जिल्हा बँकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. उद्यान विद्या महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी नारळ सुपारीच्या बागायतीला अधिक आधुनिक रूप देण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री. परब यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना सोसायटीच्या वतीने सुपारीची रोपे वाटण्यात आली. मेळाव्याला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
..................
नव्या इमारतीसाठी प्रस्ताव सादर करा!
सोसायटीची इमारत जुनी झाली आहे. याशिवाय सोसायटीला स्वउत्पन्न वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवी इमारत बांधण्यासाठी सोसायटीला जिल्हा बँकेच्या वतीने सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष व संचालकांनी दळवी यांच्याकडे केली. यावर दळवी यांनी, नव्या इमारतीला जिल्हा बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात आर्थिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आवाहनही केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

