रत्नागिरी-घटनेतील तरतुदींबाबतचा प्रवास उलट्या दिशेने

रत्नागिरी-घटनेतील तरतुदींबाबतचा प्रवास उलट्या दिशेने

Published on

rat7p31.jpg
09146
रत्नागिरीः राष्ट्रीय संविधान परिषदेच्या निमित्ताने संविधान फेरी काढण्यात आली.
----------

घटनेतील तरतुदींबाबतचा प्रवास उलट्या दिशेने
माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे; रत्नागिरीत राष्ट्रीय संविधान परिषद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः देशात गेल्या दहा वर्षांत धर्मवाद वाढला आहे. विशिष्ट धर्माच्याच व्यक्तींच्या व्यवसायाच्या जागांवर कारवाई करणे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. भारताला हिंदू राष्ट्र म्हणणे हीच घटनेतील तत्त्वांची पायमल्ली आहे. हे सर्व लक्षात घेता घटनेतील तरतुदींबाबत उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे, अशी भीती उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्याला अजूनही प्रगती करायची आहे, संतुष्ट राहून चालणार नाही. घटना आणि घटनेला कुठला समाज अभिप्रेत आहे हे लोकांना समजण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संविधान जागर विचार मंच, महाराष्ट्र यांच्यावतीने रविवारी (ता. ७) रत्नागिरीत आयोजित राष्ट्रीय संविधान परिषदेत ते बोलत होते. ‘भारतीय संविधानातील उद्धृत सामाजिक न्याय’ या विषयावर न्या. ठिपसे यांनी विचार मांडले. या वेळी परिषदेचे उद्घाटक अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर रामानुजन दीक्षित आणि परिषदेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय कांबळे उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाचे पूजन करून आणि दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी न्या. ठिपसे म्हणाले, आपण कायदा शिकतो, पण संविधानातील तरतुदींची गरज काय, असा वाद घालणारेही अनेकजणं पाहिलेले आहेत. मात्र हे चुकीचे आहे, कारण संविधान हाच सर्वांत मोठा कायदा आहे. घटना म्हणजे देशासाठी तयार केलेले नियम आहेत. पण याबाबत लोकांना कमी ज्ञान आहे आणि त्याचा फारसा विचार करायची गरज वाटत नाही, हे दुर्दैव आहे. भारतात अनेक प्रकारच्या विषमता असून,
अजूनही सामाजिक समानता प्रस्थापित झालेली नाही. धार्मिक उद्रेकामुळे धोके वाढले आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच मूलभूत अधिकार, संधींची समानता, बाळंतपणाची रजाविषयक कायदा, किमान वेतन कायदा, स्त्रियांवरील अत्याचार, विशाखा कायदा, ॲट्रॉसिटी ॲक्ट आदींवरही प्रकाश टाकला. सामाजिक न्यायाबाबतच्या अनेक तरतुदींचा आंबेडकरांमुळे घटनेत समावेश झाल्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी रत्नागिरी शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मारुती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृहापर्यंत संविधान दिंडी काढण्यात आली. यामध्ये शाळा-महाविद्यालयातील एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि आदर्शांवर आधारित ‘‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’’ हे प्रसिद्ध सामाजिक नाटक सादर करण्यात आले.

चौकट

महिलांना मतदानाचा अधिकारासाठी डॉ. आंबेडकर आग्रही ः डॉ. जाधव
परिषदेचे उद्घाटक डॉ. नरेंद्र जाधव यांनी ‘मी भारतीय नागरिक आणि संविधान’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, १८९५ पासून संविधानासाठी १२ वेळा प्रयत्न झाले, यात ८ प्रयत्नांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, मतदानाचा अधिकार धनाढ्य, शिक्षित अशा केवळ ३ टक्के लोकांनाच होता; मात्र सर्वसामान्यांसह महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळावा असा आग्रह डॉ. आंबेडकर यांनी धरला. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, अशा काळात, १९१९ मध्ये भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी डॉ. आंबेडकर आग्रही होते, हे ते काळाच्या किती पुढे होते याचे निदर्शक आहे.

चौकट
राजे यांचा गौरव
संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योगदान देणारे प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांना पहिला राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच प्रा. डॉ. शाहू मधाळे यांच्या विषामृत या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com