ईश्वरनिष्ठा
संतांचे संगती पसायदान-------लोगो
(४ डिसेंबर टुडे ३)
ईश्वरनिष्ठा...
भगवतपूज्यपाद श्री आद्य शंकराचार्य यांची परंपरा आजही अशीच सुरू असल्याचे आपल्याला आढळते. या सर्वच शुद्ध परमार्थ परंपरांनी लोककल्याणाचीच अपेक्षा केली. सर्वजण सुखी असावेत, सर्वजण शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न असावेत, अशीच भारतीय संस्कृतीची शिकवण त्यांनीही आपल्या कृतीने दिली आहे. हाच उपदेश आपल्या शिष्यांसाठी शब्दबद्धही करून ठेवला आहे. यापुढील ओव्यांमध्ये त्यांनी अशा खऱ्या संतांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
- rat१०p१.jpg-
२५O०९७००
- धनंजय चितळे
---
वर्षत सकळमंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी। भेटतू यां भूता।।
सर्वकाळी आणि सर्वत्र मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संप्रदाय सर्वांना भेटावेत. बऱ्याच वेळा या ओवीचे चिंतन करताना अनेक मंडळी मांदियाळी या शब्दाचा अर्थ ईश्वरनिष्ठांचे समूह असा करतात; पण तो अर्थ येथे अपेक्षित नाही. मंदिरांमध्ये उत्सवांमध्ये मोठी गर्दी असते. या गर्दीला आपण ईश्वरनिष्ठ म्हणू शकतो का? याचा आपणच प्रत्येकाने विचार करावा. आपली धारणा समर्थ श्री रामदास स्वामी दासबोधात सांगतात त्याप्रमाणे आहे. आम्ही तोंडाने म्हणतो की, आम्हाला देवाशिवाय कोणी नाही; पण तशी कृती दिसत नाही, असे समर्थ सांगतात.
‘देवावेगळे कोणी नाही। ऐसे बोलती सर्वही।
परंतु त्यांची निष्ठा काही। तैशीच नसे।।
ईश्वरनिष्ठ म्हणजे भगवंत जे करतात ते आपल्या हिताचेच आहे, असे मानून कोणतीही कुरकूर न करता जगणारे सज्जन होत. आग्रह नाही आणि तक्रार नाही, हे परमार्थाचे महत्त्वाचे सूत्र आहे. त्याचे पालन होण्यासाठी श्री सद्गुरूकृपेची आवश्यकता असते. आपला आचार कसा असावा, याचे मार्गदर्शन खरे अधिकारी सत्पुरुष आपल्या कृतीनेच करत असतात. आपल्या शिष्याकडून जर काही चूक झाली तर ती चूक दुरुस्त करण्याचे कामही तेच करतात.
आपल्या साधकाला परमार्थ पथावरून ते कधीही बाजूला होऊ देत नाहीत. हे ईश्वरनिष्ठ अनवरत म्हणजे अखंड भेटावेत, अशी प्रार्थना श्री ज्ञानेश्वर महाराज करतात म्हणजेच शुद्ध आणि चोख परमार्थ सांगणाऱ्या खऱ्या गुरुपरंपरा अखंडपणाने चालत राहाव्यात, अशी मागणी ते करतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांची विचारधारा पुढे नेणारे पावस येथील स्वामी स्वरूपानंद असतील किंवा पुण्याचे परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे असतील. ही मंडळी परंपरा कशी अखंड टिकते याची चालतीबोलती उदाहरणेच आहेत.
शब्दप्रभू श्री ज्ञानेश्वर माऊलींचे शब्दांचे नियोजन पाहिले की, आपण आश्चर्यचकित होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हे संत म्हणजे कल्पतरूंची बाग आहे; पण हे कल्पतरू एका जागी स्थिर असणारे नाहीत तर ते फिरणारे आहेत. संत हे चिंतामणीसारखे रत्न आहेत; पण ते निर्जीव असून, चैतन्ययुक्त चिंतामणी आहेत आणि त्यांचे बोलणे हे अमृताच्या सागरासारखे आहे. थोडक्यात, ज्याची उपमा द्यायची त्या शब्दाची मर्यादा काढून तो शब्द परिपूर्ण करून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मगच त्याची पसायदानात योजना केली आहे.
चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव।
बोलते जे अर्णव। पियुषांचे।। या ओवीचे व पुढील ओव्यांचे चिंतन करूया.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

