भक्ती आणि हाव याच्या संघर्षाची कथा
-rat१०p२.jpg-
P२५O०९७०३
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत वीरशैव समाज-लांजा या संस्थेने सादर केलेल्या ''ईठ्ठला'' या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळः सकाळ छायाचित्रसेवा)
------
भक्ती आणि हाव याच्या संघर्षाची कथा
‘ईठ्ठला’ला दाद ; वीरशैव समाजसंस्थेचा प्रयत्न
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः हाव काही सुटंना...पोट काही भरना... अशी पार्श्वभूमी असलेली ४०० वर्षापूर्वीची कथा राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील सांगतेला ‘ईठ्ठला’ या नाटकातून पाहायला मिळाली. पांडुरंगाशी लीन झालेल्या वारकऱ्याला नामस्मरणात बेभान होऊन केवळ पोटासाठी हत्या करावी लागते. वीरशैव समाज लांजा या संस्थेने हा प्रयोग केला. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अमोल रेडीज यांनी केले होते. अभिनय, नेपथ्यात रंगलेल्या या नाटकाला रसिकांनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.
---
वारकऱ्यांच्या वाटेवरील एक भलंमोठ घर. वारकरी दिंडीचे विश्रांतीचे ठिकाण; पण कालांतराने रस्त्यात बदल झाल्यानंतर जंगलात असलेल्या घरात वारकऱ्यांचे येणे-जाणे कमी होते. त्या घरातील तुका, जना आणि लहान मुलगा-नामा असे राहात असतात; पण वारकरी विश्रांतीसाठी घरात येत नसल्यामुळे त्यांना अन्न मिळणे मुश्किल होते. तिघंही पांडुरंगाचे नामस्मरण आणि पाणी पिऊन दिवस कंठत असतात. एके दिवशी नामाचा मामा घरी येतो. येताना तो कंदमुळे-करांदे घेऊन येतो. मामा घरातून निघताना त्याची मुलगी शेवंता व नामा यांचा दोघे मोठे झाल्यानंतर विवाह करावा, असे ठरते. अन्न मिळत नसल्यामुळे मामा नामाला बाहेरगावी कामासाठी घेऊन जातो. १० वर्षासाठी नामा बाहेरगावी जाणार यावरून दोघांनाही भरून येते. मामाबरोबर नामा निघून जातो. तुका, जना दोघं उभयंता आठ-आठ दिवस उपाशीच असतात. एके दिवशी यादव राजाच्या दरबारातील सोन्याचा व्यापारी तुका-जनाच्या घरात राहण्यासाठी येतो. त्याचा पाहुणचार केला जातो; पण तुका-जनाकडे अन्न नसते. त्याने दिलेल्या भाकरीवरच त्यांची रात्र जाते; पण जनाच्या मनात सोन्याचा व्यापारी असल्यामुळे भुकेमुळे हाव निर्माण होते. घर जंगलात असल्याचा फायदा घेऊन तुकाला व्यापाऱ्याला मारायला सांगते. आयुष्यभराची पुंजी मिळेल असे सांगते. पांडुरंगभक्त तुका जनाला खूप समजावतो. ज्याने चोच दिली आहे तो अन्न देणार, पाडुंरग हे दिवस घालवणार विश्वास ठेव असेही सांगतो. अखेर पत्नी प्रेमासाठी हत्या करण्यास तयार होतो. दोघंही पांडुरंगाच्या नामस्मरणात गजरात बेभान नाचतात. तुका फरशी घेऊन खोलीत जातो आणि व्यापाऱ्याचा मुडदा पाडतो. तो गोणत्यात भरून त्याला पुरून टाकतात. व्यापाऱ्याच्या घोड्याला जंगलाच्या बाहेर सोडून देतात. माणसाची हाव संपत नाही चटक लागते. असे करून दोघे नऊ वाटसरू वारकऱ्यांचा खात्मा करून त्यांच्याकडील सोनंनाणं घेतात. जना सोन्याचे सर्व दागिन्यांपैकी काही आपल्याजवळ ठेवून उर्वरित विहिरीत टाकत असते.
दहा वर्षानंतर त्यांचा मुलगा-नामा वारकरी होऊन घरात येतो. तुका-जना त्याला ओळखत नाही. त्याला राहण्यासाठी खोली देतात. रात्री पुन्हा जना तुकाला वारकऱ्याला मारायला सांगते; पण तुका तयार होत नाही. ‘जने तू इतकी निर्ढाव कशी झालीस. पांडुरंग अठरापगड जातीवर प्रेम करायला शिकवतो, असे सांगतो. तुका त्याला मारण्यासाठी नकार देतो. आपण पांडुरंगाचे नामस्मरण करूया, असे सांगतो. नामस्मरणात बेभान होऊन नाचत असताना जना फरशी घेऊन दहा वर्षांनंतर वारकरी बनून आलेल्या स्वतःच्या मुलाची नामाची हत्या करते. त्याची विल्हेवाट लावतात. त्यानंतर नामाचा मामा, मुलगी शेवंताला घेऊन घरी येतो. त्या वेळी तो सांगतो की, नामा एक दिवस आधी येथे आला आहे. त्या वेळी दोघेही मोठी आरोळी ठोकतात. त्यांची कर्म त्यांच्यासमोर उभी राहतात, अशी कथा या ईठ्ठला या नाटकात सादर करण्यात आली.
---------
सूत्रधार आणि सहाय्य
निर्माता ः जयप्रकाश पाखरे. नेपथ्यकार ः संदीप सावंत व शरद चव्हाण. पार्श्वसंगीत ः प्रदीप कांबळे, पार्श्वगायक व नृत्यदिग्दर्शक ः महेश बामणे. पखवाज वादकः परशुराम गुरव. गीतकार ः अमोल रेडीज. रंगभूषा ः गजानन पांचाळ. वेशभूषा ः संतोष डोर्लेकर, दामिनी भिंगार्डे, अनघा देवस्थळी, जितेंद्र कुरतडकर. प्रदीप कशेळकर.
---------------
पात्र परिचय
तुका ः अमोल रेडीज, जना ः अर्चना पेणकर-पांचाळ, नामा ः पियुष कुडतरकर. मामा ः शरद चव्हाण, व्यापारी ः विजय शिंदे, माणूस ः अमित जाधव, तरुण ः शशांक उपशेट्ये, वारकरी ः प्रदीप माजळकर, राकेश दळवी. शेवंता ः पूर्वा कांबळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

