साठा घटला; पाणी आडवा!
09714
साठा घटला; पाणी आडवा!
कणकवलीवासीय ः गड नदीपात्रातील केटी बंधाऱ्याबाबत मागणी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० ः यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरीही सध्या गड नदीपात्रातील पाणीसाठ्यात मोठी घट होऊ लागली आहे. नदी पात्रातील पाण्यावरच कणकवलीसह बहुतांश गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. त्यामुळे नदी पात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
गड नदीपात्रातील ९ बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण करण्याबाबत लघु पाटबंधारे विभागाने निविदा मागविल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष बंधाऱ्यात प्लेट टाकून पाणी अडविण्याच्या कामाला जानेवारी अखेरीस सुरवात होते. तोपर्यंत बरेचसे पाणी वाहून जात असल्याने बंधाऱ्यात अल्प प्रमाणात पाणीसाठा होतो. त्यामुळे तातडीने गड नदीपात्रातील बंधाऱ्यात पाणी साठवण व्हावी, अशी तालुकावासीयांची अपेक्षा आहे.
गड नदीपात्रातील कनकनकगर येथील बंधाऱ्यावर कणकवली नगरपंचायत आणि लगतच्या हळवल गावची नळयोजना अवलंबून आहे. त्याचप्रमाणे सांगवे, नाटळ, शिवडाव, हरकुळ, वागदे, कलमठ, आशिये, वरवडे आदी गावांच्या नळयोजना गड नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये साठणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत.
गतवर्षी प्रमाणेच यंदाही बंधाऱ्यांमध्ये रबर प्लेटस आणि प्लास्टिकचा वापर करून तातडीने पाणी साठा केला जावा, अशी तालुकावासीयांतून मागणी होत आहे. यंदा मुबलक पाऊस झाल्याने कणकवली शहरालगतच्या गड आणि जानवली नदीपात्रात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. तालुक्यातील फक्त गडनदीपात्रातच केटी बंधारे उभारण्यात आले आहेत तर जानवली नदीपात्रात कच्चे बंधारे बांधून तेथील ग्रामपंचायतींकडून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जातो.
कणकवली तालुक्यात दरवर्षी एप्रिलपासून पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत असल्याने लघु पाटबंधारे विभागाने गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यांमध्ये निडल्स टाकून पाणी साठवण करण्याबाबत निविदा जारी केली आहे. यात गडनदीपात्रातील १, ३, ४, ६, ७, ९, ११, १२ आणि १३ या क्रमांकाच्या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होणार आहे. या निविदांसाठी ठेकेदार निश्चित झाल्यानंतर तातडीने बंधाऱ्यात प्लेट टाकण्याची कार्यवाहीची प्रतीक्षा नागरिकांना आहे.
--------------
...तरच मे अखेरपर्यंत मुबलक पाणी
डिसेंबर अखेरपर्यंत जर गड नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला तर मे अखेरपर्यंत कणकवली शहरासह लगतच्या सर्व गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होतो. जानेवारी किंवा फेब्रुवारीत पाणी साठा अडविण्यास सुरवात झाली तर एप्रिलमध्ये पाणीसाठा संपुष्टात येतो. गतवर्षी जानेवारी अखेरीला पाणीसाठा अडविण्यात आला. त्याचप्रमाणे केटी बंधाऱ्यामध्ये रबर प्लेट, प्लास्टिक कापड टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पाणीसाठाच अल्प प्रमाणात झाल्याने तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. परंतु, गतवर्षी मेच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाला सुरवात झाल्याने पाणी टंचाईचे संकट टळले.
--------------
नळयोजनेची गावे
* सांगवे
* नाटळ
* शिवडाव
* हरकुळ
* वागदे
* कलमठ
* आशिये
* वरवडे
-------------
कोट
डिसेंबर अखेरपर्यंत कणकवली शहरातील कनकनगर आणि मराठा मंडळ येथील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होणे आवश्यक आहे. जर पाणी साठवणूक करण्यासाठी जानेवारी उजाडला तर येथील बंधाऱ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा होणार नाही. परिणामी एप्रिलपासूनच शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केटी बंधाऱ्यातील पाणी साठवण निविदांना मंजूरी मिळाल्यानंतर तातडीने कणकवली शहरातील कनकनगर आणि मराठा मंडळ येथील बंधाऱ्यात पाणीसाठा व्हायला हवा. त्याबाबतची मागणी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
- सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

