दापोली- दापोलीत हुडहुडी, पारा ७.२ अंशांवर
पा न१
०९७६३
वाढावा
०९७३७
दापोलीत हुडहुडी; पारा ७.२ अंशांवर
यावर्षीचे सर्वात नीचांकी तापमान ः पर्यटकांचे बुकिंग वाढले; बागायतदार खूश
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १० ः दापोलीत थंडी वाढली असून बुधवारी पहाटे किमान तापमान ७.२ अंश सेल्सिअसइतके नोंदले गेले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२४ ला पारा ७.८ अंश सेल्सिअसइतका उतरला होता; मात्र यंदाचा गारठा त्याही विक्रमाला मागे टाकत अधिक तीव्र झाला आहे.
किनारपट्टी भागात थंडी थोडी विरळ असली तरी दापोलीत मात्र पहाटे अक्षरशः धुक्यासह गारठा पसरला होता. थंडीचे चटके वाढल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत हिवाळ्याची ही परतलेली चाहुल कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक ठरत आहे. तापमानातील घट आंबा-काजूपिकांसाठी पोषक ठरणार असल्याने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवामान ढगाळ राहिल्याने मोहोर प्रक्रिया मंदावली होती; मात्र गारवा उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
थंड, आल्हाददायक हवामानामुळे पर्यटन क्षेत्रालाही उभारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. गारठा वाढला की, पर्यटक दापोलीत जास्त दिवस मुक्काम करतात. त्यामुळे हॉटेल्स, रिसॉर्टस, वाहतूक व्यवसायाला सरळ फायदा होतो, असे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून सावधानतेचे आवाहन अचानक तापमान घटल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. तर हवामान खात्यानुसार पुढील चारेक दिवस थंडीची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दापोलीत वाढलेल्या या ऐतिहासिक गारव्यामुळे कृषी, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण झाले असून, आगामी दिवस आशादायी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोट
दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरणामुळे मोहोर धरायला अडथळा येत होता; पण आता पारा ७.२ अंशांवर आल्याने आंब्याला गारवा मिळतो आहे. या तापमानामुळे फुलधारणा सुधारेल आणि उत्पादनात वाढ होईल, असे वाटते. गेल्या वर्षीही ७.८ अंश तापमानामुळे मोहोर चांगला आला होता; त्यामुळे यंदाची थंडी अधिक फायदेशीर ठरेल असे वाटते.
- सचिन तोडणकर, सररपंच, आंबा बागायतदार, कर्दे
कोट
या वर्षी पारा ७.२ अंशांवर घसरल्याने दापोलीचा गारवा अगदी महाबळेश्वरलाही भिडेल, असा माहोल तयार झाला आहे. अशा हवामानात पर्यटक दापोलीत जास्त दिवस मुक्काम करतात. सध्या चौकशी आणि बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ दिसते आहे. सणासुदीच्या काळात तर येणारी गर्दी आणखी वाढेल. पर्यटन व्यवसायासाठी ही थंडी अक्षरशः वरदान ठरणार आहे. या वर्षी काजूचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे.
- आशीष मयेकर, हॉटेल व्यावसायिक
निचांकी तापमानाच्या नोंदी
- २ जानेवारी १९९१ ः ३.४ अंश सेल्सिअस
- २० फेब्रुवारी २०१९ ः ४.५ अंश सेल्सिअस

