

kan112.jpg
09924
कलमठ : येथील पिंपळपार मंदिर मंडपावरून वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.
मंदिराच्या सभा मंडपावरून टाकली वीज वाहिनी
कलमठ ग्रामस्थांची हटविण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
कणकवली, ता. ११ : तालुक्यातील कलमठ-सुतारवाडीतील पिंपळपार येथे उभारलेल्या लोखंडी सभा मंडपावरून महावितरणतर्फे वीज वाहिनी टाकली आहे. या वीज वाहिनीमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही वाहिनी तातडीने हटवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कलमठ ग्रामस्थांनी दिला आहे.
कलमठ ग्रामस्थांनी याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सुतारवाडी येथील पिंपळपार येथील मंदिरावर सभा मंडप उभारण्यात आला. या मंडपावरून महावितरणकडून २४० केव्ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. ही वाहिनी टाकताना महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना अथवा दक्षता घेतलेली नाही. विद्युत वाहिनीवर टाकण्यात आलेले प्लास्टिक आवरण निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच विद्युत वाहिनी आणि सभा मंडपाच्या छप्परामधील अंतर खूप कमी आहे. जोरदार वारा किंवा अन्य कारणांमुळे ही वाहिनी थेट सभा मंडपाच्या छप्पराला चिकटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दुर्घटना घडून जीवित हानी होण्याचीही शक्यता आहे. वस्तुत: वीज वाहिनी ओढताना ती सभा मंडप छप्पराच्या अधिक उंचीवरून नेणे गरजेचे होते.
आचरा मार्गालगत असलेल्या या मंदिर परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तत्काळ उपाययोजना करावी, ही उपाययोजना करण्यास विलंब झाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ आंदोलन करतील. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या परिसरात दुर्घटना घडल्यास त्याला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, असा इशारा देण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना कलमठ ग्रामपंचायतीचे सदस्य धीरज मेस्त्री, उदय खोचरे, मनोहर कोरगावकर, बाळकृष्ण मेस्त्री, अरविंद खोचरे, प्रवीण कोरगावकर, भूषण ठाकूर, महेश कोरगावकर, अनिल हर्णे, सुनील रेपाळ, सुनील राऊत, नितीन मेस्त्री उपस्थित होते.
चौकट
मंडपाच्या नवीन बांधकामामुळे धोका
कलमठ-सुतारवाडी येथील नागरिकांना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिल्यानंतर महावितरणने या संदर्भात कलमठ ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केले आहे की, सभा मंडप उभारण्यापूर्वी विद्युत वाहिनी सुरक्षित अंतरावर होती. मात्र, नवीन बांधकामामुळे विद्युत वाहिनीचे किमान सुरक्षित अंतर कमी होऊन जीवित आणि वित्तहानीचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी दुर्घटना घडल्यास त्याला ग्रामपंचायत प्रशासन प्रशासन जबाबदार राहील. तसेच नवीन बांधकामामुळे असुरक्षित झालेली विद्युत वाहिनी सुरक्षित करण्यासाठी येणारा खर्च तसेच त्यासाठी पर्यायी सुरक्षित जागा आपण उपलब्ध करून दिल्यास हे काम करण्यात येईल, असे महावितरणने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.