सिंधुदुर्गात रापण मासेमारी अडचणीत

सिंधुदुर्गात रापण मासेमारी अडचणीत

Published on

swt117.jpg
09976
कुणकेश्वर : येथे पारंपरिक रापण संघातील मच्छीमारांनी समुद्रावर स्वार होत मच्छीमारीसाठी प्रस्तान केले.

सिंधुदुर्गात रापण मासेमारी अडचणीत
शेकडो कुटुंबांसमोर प्रश्नः अधिवेशनात दिलासा मिळेल अशी अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ : देवगड तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यात रापण मासेमारी अडचणीत आली आहे. समुद्रातील मासळीची अवैध लूट, वातावरणातील बदल ही याची प्रमुख कारणे आहेत. यावर किनारपट्टीवरील शेकडो मच्छीमार कुटुंबे अवलंबून आहेत. देवगडमधील मच्छीमारांनी आता या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
वेळोवेळच्या बदलत्या नैसर्गिक परिस्थितीसह अन्य विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या पारंपरिक रापण मच्छीमारांना राज्याकडून नेमके काय पदरात पडणार, यासाठी मच्छीमारांचे डोळे राज्याच्या अधिवेशनाकडे लागले आहेत. मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी तातडीने मत्स्य दुष्काळ जाहीर करून शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मच्छीमारांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील मच्छीमारांच्या दृष्टीने कोणता सकारात्मक निर्णय घेतला जाणार, याबाबत मच्छीमारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हिवाळी अधिवेशनात याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला असल्याने राज्य शासन काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
रापण मासेमारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. ही मासेमारी विशिष्ट ठिकाणी किनाऱ्यावर केली जाते. रापण संघ हे सहकाराचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. एकट्या देवगड तालुक्यात मुणगेपासून विजयदुर्गपर्यंत सुमारे १९ रापण संघ आहेत. त्यातील सद्यस्थितीत १८ रापण संघ कार्यरत आहेत. काही पारंपरिक मच्छीमारांकडून अशा पद्धतीने मासेमारी केली जाते. एका रापण संघात साधारणतः ३० ते ७० जणांचा समावेश असतो. प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य गृहित धरल्यास रापण मच्छीमारीवर अनेक मच्छीमार कुटुंबे अवलंबून असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
यावरून सिंधुदुर्गाच्या पूर्ण किनारपट्टीवर किती कुटुंबे यावर अवलंबून असतील, याची कल्पना येते. हवामान चांगले असेल आणि समुद्रातील वातावरण स्वच्छ असल्यास साधारणपणे गणेशोत्सवानंतर रापण मासेमारीला सुरुवात होते. पुढे काही महिने ही मासेमारी चालते; मात्र यंदा लांबलेला परतीचा पाऊस, समुद्रातील वादळ सदृश स्थिती आणि रोजचे बदलते वातावरण यामुळे मच्छीमारी बंदी कालावधी संपल्यानंतरही पूर्ण क्षमतेने मच्छीमारी हंगाम सुरू होण्यात अडचणी आल्या. पावसामुळे स्थानिक मासेमारी थंडावली. स्थानिक नौकांसह बाहेरील मच्छीमारी नौका आश्रयासाठी येथील सुरक्षित बंदरात दाखल झाल्या होत्या.
बदलत्या हवामानाचा फटका सर्वच मच्छीमारांना बसला.‌ यामुळे पारंपरिक रापण मच्छीमारीमध्येही व्यत्यय आल्याने मच्छीमार कुटुंबांचे उत्पन्न बुडाल्याचे सांगण्यात येते. यातून दिलासा देण्यासाठी तातडीने मत्स्य दुष्काळ जाहीर करून शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मच्छीमारांची मागणी आहे. यासाठी मच्छीमारांनी आता शासनाचे दार ठोठावले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अन्य कारणांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील मच्छीमारांना दिलासा देण्याची मागणी आता होऊ लागली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. तसेच आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याच्या विचारात असल्याचे मच्छीमार सांगतात.
मच्छीमारांनी आपली कैफियत प्रशासनाकडे पोचवली आहे. या अनुषंगाने मत्स्य विभागाला निवेदनही देण्यात आले आहे. यातून पारंपरिक बिगर यांत्रिक रापण व्यवसायाची आजची परिस्थिती हलाखीची बनली आहे. आधुनिक प‌द्धतीने होणारी अतिरिक्त मासेमारी व त्यामुळे निर्माण झालेला मत्स्य दुष्काळ, पाऊस व वादळ सदृश परिस्थिती, समुद्राची बिघडलेली स्थिती अशा विविध संकटामुळे पारंपरिक बिगर यांत्रिकी रापण मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जिल्ह्यातील रापण मासेमारी जगवण्यासाठी रापण संघांना आर्थिक सहाय्य मिळणे आवश्यक आहे, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

चौकट
अशी केली जाते रापण मासेमारी
रापण मासेमारी करताना समुद्रात होडीच्या सहाय्याने जाळे पसरवले जाते. जाळे पसरवल्यानंतर काही वेळाने किनाऱ्यावर रापण ओढली जाते. यामध्ये समुद्रातील ताजी मासळी किनाऱ्यावर जाळ्यासोबत आणली जाते. आणलेली मासळी जाळ्यातून बाहेर काढून त्याचे वर्गीकरण केले जाते. ग्राहक उपलब्ध असल्यास मासळीची तेथेच विक्री केली जाते; अन्यथा बाजारात मासे विकले जातात.

चौकट
ताज्या मासळीला खवय्यांची पसंती
रापण मासेमारीची मासळी एकदम ताजी असल्याने त्याला मोठी मागणी असते. समुद्रात मोठ्या प्रमाणावर एकत्र मासळी असल्यास जाळ्यात सापडू शकते; अन्यथा काहीवेळा जाळ्यात पुरेशी आणि चांगल्या दर्जाची मासळी मिळत नाही. एकदा रापण लावल्यास ती ओढण्यासाठी सुमारे तास ते दीड तास वेळ जातो. पुरेशी मासळी मिळत नसल्यास पुन्हा रापण लावण्यामध्ये मच्छीमारांचा उत्साह राहत नाही.

चौकट
रापण महोत्सवाचे आयोजन रखडले
रापण मासेमारी कशी केली जाते, याचे व्यवस्थापन कसे चालते, जाळ्यात मासळी कशी सापडते, रापण किनाऱ्यावर कशी ओढली जाते, जाळ्यातून मासळी कशी सोडवली जाते, याची पर्यटकांना माहिती मिळावी आणि यातून स्थानिक पर्यटन वृध्दी व्हावी, यासाठी अलीकडे कुणकेश्वर येथील किनाऱ्यावर रापण महोत्सव आयोजित केला जातो. येणाऱ्या पर्यटकांना ताज्या मासळीचा आस्वाद घेता येतो. याला पर्यटकांची पसंती असल्याचे दिसून येते; मात्र या महोत्सवाचेही नियोजन अद्याप झाल्याचे दिसत नाही.

चौकट
रापण मच्छीमार संघाचा आंदोलनाचा पवित्रा
यंदाच्या रापण हंगामात समाधानकारक मासळी मिळाली नाही. परतीच्या लांबलेल्या पावसामुळे रापण हंगामाची सुरुवात खडतर झाली. रापण मच्छीमारीवर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने मच्छीमारांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. हिवाळी अधिवेशनात सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या तसेच तीव्र आंदोलन छेडण्याच्या निर्णयावर मच्छीमार ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com