साखरपुड्याच्या दिवशी घरफोडी
सहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
दापोलीतील प्रकार ; मेहंदीच्या कार्यक्रमावेळी चोरट्याचे कृत्य
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ११ ः दापोली शहरातील शिवाजीनगर येथील ऐश्वर्या बंगल्यामध्ये साखरपुड्याच्या तयारीदरम्यान घरात ठेवलेले सोन्याचे दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री साडेअकरा या वेळेत हा प्रकार झाला असून, दागिन्यांची एकूण किंमत सुमारे सहा लाख रुपये असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
फिर्यादी संगीता संदेश तलाठी (वय ५९, रा. शिवाजी नगर, दापोली) यांच्या घरी त्या दिवशी साखरपुड्याची मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमादरम्यान फिर्यादी यांनी हातावर मेहंदी असल्यामुळे काढलेल्या सहा तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या ड्रेसिंग टेबलच्या पहिल्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या. फिर्यादी या आरोग्याच्या कारणास्तव औषधे घेत असल्याने त्यांना त्या वेळेत झोप लागली. या काळात घरातील इतर महिलांनाही मेहंदी काढण्यात आली; मात्र कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

