वस्तीत मोबाईल टॉवरला विरोध
10404
ओटवणे ः टॉवरला परवानगी न देण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिले.
वस्तीत मोबाईल टॉवरला विरोध
ओटवणेतील ग्रामस्थ संतप्त; परवानगी न देण्याचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १३ ः ओटवणे गावठणवाडी येथे भरवस्तीत उभारण्यात येणाऱ्या खासगी कंपनीच्या मोबाईल टॉवरला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. विश्वासात न घेता मनोऱ्याचे काम सुरू केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम थांबविले. तसेच या टॉवरला ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ओटवणे गावठणवाडी येथे कोणतीही लेखी परवानगी न घेता, तसेच या भागातील लोकांना विश्वासात न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी विचारणा केली असता हे काम खासगी कंपनीचे असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीत चौकशी केल्यावर लेखी परवानगी दिली नसल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोणतीही लेखी परवानगी नसताना आणि लोकांची मागणी नसताना नको असलेला टॉवर ग्रामस्थांच्या कपाळी मारण्याच्या कंपनीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत सुरू असलेले काम थांबविले. तसेच ग्रामपंचायतीला निवेदन देत या टॉवरसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.
ओटवणे पेरणे येथे काही वर्षांपूर्वी बीएसएनएल टॉवर उभारण्यात आला; मात्र त्याचा कोणताही उपयोग ग्रामस्थांना होत नाही. त्यामुळे रेंजअभावी मोठी गैरसोय होत आहे. विलवडे येथील टॉवरचा या भागातील ग्रामस्थांना काही प्रमाणात फायदा होतो. असे असताना आणखी एक टॉवर आणि तोही भरवस्तीत होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. रेडिएशन, लाईटनिंग, याचबरोबर भविष्यात होणाऱ्या नुकसानीचा विचार करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
०००
ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ नको!
ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळून कंपनीकडून काम होत असेल तर अशा कामाला विरोध केला जाईल. कंपनीला टॉवर उभारायचा असेल तर तो लोकवस्तीपासून दूर उभारावा; अन्यथा कंपनीच्या विरोधात उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या वस्तीतील रहिवाशांच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले. यावेळी जयगणेश गावकर, सत्यवान गावकर, आकाश मेस्त्री, सुधीर देवळी, विनोद मुळीक, पंकज गावकर, ओंकार गावकर, बाबली गावकर, संजय गावकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

