बेरकी गावकऱ्यांचे तंटे अन् मुक्ती

बेरकी गावकऱ्यांचे तंटे अन् मुक्ती

Published on

गावच्या मालका .........लोगो

ग्रामीण भागात आजही किरकोळ तंटेबखेडे गावातील प्रतिष्ठित लोकांच्या मार्गदर्शात मिटवले जातात. जर सर्वच तंटे/भानगडी पोलिस वा कोर्टात गेल्या असत्या तर आहेत त्याच्या पंचवीसपट पोलिस वा कोर्ट कमी पडली असती. गावगाडा चालवणारी ही मंडळी बहुतांशी निःस्वार्थी अन् निःस्पृहपणे हे काम पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.

rat१३p२.jpg- -
25O10397
- अप्पा पाध्ये-गोळवलकर, गोळवली
---
बेरकी गावकऱ्यांचे तंटे अन् मुक्ती

तंटामुक्त समित्यांपूर्वी गावातील तंटेबखेडे मिळवणारी एक समांतर न्याययंत्रणा होती. काही ठिकाणी ती आजही आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या न्यायमंडळात गावचे मानकरी, गावकर, वाडीचे खुमदार अशी मातब्बर मंडळी असतात. आमच्या गावातही ही पद्धत सुरू आहे; मात्र आता त्याचे प्रमाण काहीसे कमी झालेय हे नक्की.
एक किस्सा मला आठवतोय. झाली असतील या गोष्टीला ३०-४० वर्षे, आमच्या घरात ब्रिटिशकाळापासून पोलिसपाटीलकी आहे. त्या वेळी माझे काका पोलिस पाटील होते तर कोणाचे भांडण झाले की, एक पक्ष रात्रीबेरात्रीसुद्धा आमच्या घरी यायचा. शिवीगाळ झाली, पायला(मोठा कोयता) घेऊन अमकातमका मारेन म्हणतो, अशी कैफियत मांडायचा अन् निवाडा त्याच्या बाजूने व्हावा म्हणून हेही सांगायचा, फोजदारानू आमांनला शिव्या देलान त्या देलान पर मी बोल्लो की, आता जाता पोलिस फोजदाराकडे तवां ता म्हनाला, जा झो फोजदाराकडं. ता काय माझी xx वाकडी करतंय तां बगतां. (त्या काळी पोलिस पाटलास फौजदार म्हणत असत.)
आम्हा लहान मुलांना हे ऐकून राग येई. आम्ही काकाला म्हणायचो की, अशा शिवराळ इसमाला चांगला धडा शिकव तर काका गालातल्या गालात मिस्कील हसायचा. नंतर विरोधी पक्ष यायचा अन् तोही हीच बाब काकाला सांगायचा की, पुढे जेव्हा न्यायबैठक व्हायची तेव्हा हे सारे खोटे ठरायचे. आम्हालाही नंतर याची सवय झाली. एकदा एक गुण्या नावाचा इसम होता तो होता मोठा नग. किरकोळ बाबींवरून वाडीत तंटे करायचा, दारू खाऊन. दोन-चारवेळा तक्रार घेऊन वाडकरी आले तेव्हा काकाने त्यांना सांगितले की, गुण्या दारू पिऊन जेव्हा धिंगाणा करतो तेव्हाच तुम्ही त्याला घेऊन आमच्याकडे या. झाले आठ दिवस होतात न होतात तोच एके दिवशी तिन्हीसांजा गुण्या मॅरॅथॉनपटूसारखा धावत आमच्याकडे आला. तोही संपूर्ण भिजून कडाक्याच्या थंडीचे दिवस होते ते. आमच्याकडे पिरसा (शेकोटी) पेटवलेला होता गुण्या भिजून चिंब झालेला. धापा टाकतोय म्हणून काकाने आधी त्याला पिरशाजवळ बसायला जागा दिली अन् विचारले, गुण्या, काय झाले? तसा गुण्या म्हणतो, अवो भावकीने मला धरला नि ढोवात बुडवीत व्हते पर मी सटाकला ना धाव मारली ती हतपावत आता तुमीच काय तं बगा. या भावकीनं आज माजा जीव घेतलान असता. हे तो सांगतोय, तोच ४०-५० वाडकरी पाठोपाठ आलेच. गुण्याला शेकताना बघितल्यावर ओरडू लागले. च्वार गुलाम शेकतोस काय फोद्दाराकडे? आमानला रानोमाल धावडवून?
काकाने मग विचारले, अरे झाले काय? अन् गुण्याला तुम्ही डोहात का बुडवत होतात? तुम्ही कायदा का हातात घेत होतात?
तशी वाडीप्रमुख खुमदार म्हणाला, अवो फोजदारानू, गुण्या दोंपारपास्न सगल्यांना शिव्या देतोय. मागारणीला दांडकत व्हता तवां तुमच्या सांगन्यापरमाने आमी त्येला धरलीला नी तुमच्याकडे आनीत व्हतांव त तरीच्या शेताशी आलीला तवां गुन्या म्हनाला मला ईराक्तीला (लघवीला) व्हतंय म्हनू सोडलीला तर ह्यानं भेकऱ्यासारखी धाव मारलानना. तामनकोंडीत डुबकी मारून तुमचीकडं आलाय खोटारडा हायता. मग काकाने गुण्याच्या दोन थोबाडीत मारल्यावर गुण्याने खरे सांगितले. माते तिरडीवर जाईपर्यंत गुण्या काही सुधारला नाही असे नग होते गावात.

(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)

Marathi News Esakal
www.esakal.com