बुरंबी शिक्षण संस्था अध्यक्षपदी मोरे
बुरंबी शिक्षण संस्थेच्या
अध्यक्षपदी दिलीप मोरे
संगमेश्वर ः बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्था अध्यक्षपदी दिलीप मोरे तर प्रताप देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तसेच संस्थेचे अन्य उपाध्यक्ष म्हणून विक्रांत जाधव यांची निवड झाली. याचवेळी दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी-शिवणे यांच्या शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी दिनेश जाधव यांची निवड करण्यात आली. या वेळी दादासाहेब सरफरे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
गांधी विद्यालयाला
दोन पारितोषिके
साखरपा : नुकत्याच झालेल्या संगमेश्वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील तु. ग. गांधी विद्यालयाला दोन पारितोषिके मिळाली आहेत. ५३ वे संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शन रश्मिकांत दीपचंद गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते येथे झाली. प्रदर्शनात कोंडगाव येथील श्रीमान तुकाराम गणशेट गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आठवी ते दहावी या गटात वरद गुरव आणि मंथन भोसले यांनी तयार केलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या गवतकापणी यंत्राला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर तन्वी कदम आणि निधी जोशी या विद्यार्थिनींनी प्रश्नमंजूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षक आर. जी. घाणेकर, एच. ए. कांबळे, जी. डी. करंबेळकर, के. व्ही. गार्डी, मुख्याध्यापिका रंजन रेमणे यांनी मार्गदर्शन केले होते.
बिजघर शाळेत
केंद्रस्तर स्पर्धा
खेड : जिल्हा परिषद पुरस्कृत हिवाळी क्रीडा स्पर्धा तालुक्यातील बिजघर नं. १ प्राथमिक शाळेत राष्ट्रपती पदकविजेते निवृत्त पोलिस अधिकारी विश्वास भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. या स्पर्धेत तिसंगी आपटाकोंड केंद्रांतर्गत सात शाळांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी निवृत्त अधिकारी राजेंद्र भोसले, निवृत्त कॅ. राजाराम भोसले, निवृत्त पोलिस अधिकारी नारायण भोसले, सरपंच शुभांगी भोसले, उपसरपंच सखाराम जाधव, पोलिस पाटील प्राची मर्चंडे, खोपी प्रभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी सुनील वरेकर, मंगेश मर्चंडे, ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष विजय येरूणकर, भगवान जंगम, विश्वास मर्चंडे, कमलेश भोसले, काशिराम सुर्वे, विजय भोसले, वैशाली भोसले, राजश्री भोसले, तिसंगी केंद्रप्रमुख महेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
बंधारे उद्दिष्टपूर्तीचा
गुणदे ग्रामस्थांचा निर्धार
खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामस्थांसह अंगणवाडीसेविका व विद्यार्थ्यांनी मिशन बंधारे बांधण्याच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवत उद्दिष्टपूर्तीत गुंतले आहेत. सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच रुणाली आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांच्यासह सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी आतापर्यंत ५ ठिकाणी बंधारे बांधले आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवताना जनजागृती करण्यावर भर दिला आहे. मिशन बंधाऱ्याचे उद्दिष्ट पूर्ण करून पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ सरसावले आहेत.

