मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवासी बेजार

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवासी बेजार

Published on

- rat१३p१.jpg-
२५O१०३९६
संगमेश्वर ः महामार्गावर संगमेश्वर येथे झालेली वाहतूक कोंडी.
---
खड्डे, धूळ अन् कोंडी; संगमेश्वरची कहाणी
प्रवाशांचे हाल ; अपूर्ण कामे, पर्यटकांवर मार्ग बदलण्याची येतेय वेळ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात दररोज होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसह पर्यटक प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. ठेकेदारांनी अर्धवट सोडलेली कामे आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे यामुळे येथील प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे. काहीवेळा पर्यटकांवर मार्ग बदलण्याची वेळ येत आहे. अनेकजण पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जात आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील बऱ्याचशा टप्प्यावरील काम पूर्ण झालेले आहे. वाहतूक कोंडी ही एक नवीन समस्या बनून प्रवाशांचा मानसिक ताण वाढवत आहे. रोज दुपारी आणि रात्री वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. जवळपास दीड किमी अंतरापर्यंत वाहनांच्या दररोज रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने आणि रस्त्यावर सर्वत्र मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांची गती मंदावते. या हलगर्जीपणामुळे नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी इतकी तीव्र असते की, वाहनांची रांग जवळपास एक ते दोन किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत पसरलेली दिसून येते. अनेकवेळा वाहने तासभर जागची हलत नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो. या महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने आणखीनच गोंधळ उडतो. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. या सततच्या कोंडीमुळे नागरिकांमध्ये चिडचिडेपणा आणि राग वाढतो आहे. या गंभीर समस्येकडे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे आणि रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासोबतच वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, परजिल्ह्यातील पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. दापोली, खेड, चिपळूण येथील पर्यटनस्थळांना भेटी देऊन ते रत्नागिरी, राजापूर तालुक्याकडे येतात. तिथून ते पुढे सिंधुदुर्गकडे रवाना होतात. त्यांना मुंबई-गोवा महामार्ग उपयुक्त ठरतो; परंतु संगमेश्वरला होणारी कोंडी वेळेचे नियोजन करण्यात नेहमीच अडथळा ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
----
कोट
महामार्गावरील संगमेश्वर येथील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी जास्तकाळ वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यासंदर्भात प्रशासनाकडे मागणी करू जेणेकरून स्थानिकांसह पर्यटकांची गैरसोय होणार नाही. त्याचा स्थानिक व्यावसायिकांना फटका बसणार नाही.
- संतोष थेराडे, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com