कुडाळात ‘त्या’ चेंबरमुळे विद्रुपीकरण

कुडाळात ‘त्या’ चेंबरमुळे विद्रुपीकरण

Published on

10478

कुडाळात ‘त्या’ चेंबरमुळे विद्रुपीकरण

शिवप्रेमींकडून ठेकेदार धारेवर; त्वरित हटविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोर एमएनजीएल कंपनीमार्फत रस्त्यालगत उभारलेल्या सुमारे चार इंच उंच चेंबरमुळे परिसराचे विद्रुपीकरण झाल्याचा आरोप करीत नगरसेविका संध्या तेरसे यांच्यासह शिवप्रेमी संघटनेने हा चेंबर तत्काळ हटवून परिसर पूर्ववत सुस्थितीत करावा, अशी आग्रही मागणी केली. संबंधित ठेकेदाराने ती मान्य केली.
एमएनजीएलमार्फत शुक्रवारी (ता. १२) स्मारकासमोरील रस्त्यावर खोदाई करून चेंबर उभारला होता. रस्त्याच्या वळणावर उंच चेंबर उभारल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडखळून पडण्याची शक्यता असल्याचे शिवप्रेमींनी सांगितले. याची दखल घेत नगरसेविका संध्या तेरसे यांनी रात्रीच घटनास्थळी पाहणी करत संताप व्यक्त केला. हे चेंबर त्या ठिकाणावरून हटवून दुसऱ्या ठिकाणी उभारावा, तसेच राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील परिसर व रस्ता तत्काळ सुस्थितीत करावा, अन्यथा कुडाळ शहरात एमएनजीएलचे एकही काम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर आज सकाळी ठेकेदार व कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी नगरसेविका तेरसे यांच्यासह शिवप्रेमी संघटनेचे रमाकांत नाईक, विवेक पंडित, स्वरूप वाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ठेकेदाराला जाब विचारत चेंबर तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली. अखेर संबंधित ठेकेदाराने चेंबर दुसऱ्या बाजूस उभारून परिसरात काँक्रिटीकरण करून जागा पूर्ववत सुस्थितीत करण्याचे मान्य केले. दरम्यान, एमएनजीएलमार्फत शहरात सुरू असलेल्या कामांबाबत नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी श्रीमती तेरसे यांनी व्यक्त केली. शहरात कुठे खोदाई करायची, चेंबर कुठे उभारायची, याची माहिती नगरपंचायतीला नसणे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा नकाशा हातात घेतल्याशिवाय व नगरपंचायतीला विश्वासात न घेता कोणतेही काम होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. एमएनजीएलच्या मनमानी कारभाराबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे रीतसर तक्रार करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com