राज्य नाट्यची अंतिम फेरी अमरावतीला
लोगो
राज्य नाट्य स्पर्धा
अंतिम फेरी अमरावतीला नेण्याचा घाट
रत्नागिरीतील नाट्यकर्मींत नाराजी ः मंत्री उदय सामंत यांच्या निर्णयाकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६४ व्या राज्य नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत होण्याकरिता रसिक, नाट्यकर्मी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने जोरदार मागणी केली आहे; परंतु ही स्पर्धा अमरावतीला नेण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधींनी घाट घातल्यामुळे रत्नागिरीतील नाट्यकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही स्पर्धा रत्नागिरीतच व्हावी, यासाठी उद्योगमंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी ताकद लावून ही स्पर्धा रत्नागिरीत आणावी, अशी मागणी नाट्यकर्मींनी केली आहे.
गेल्या ६४ वर्षांत प्रथमच रत्नागिरीकरांना अंतिम फेरीच्या निमित्ताने सांस्कृतिक मेजवानी मिळणार होती, त्यावर आता राजकीय विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरीत नियोजित असलेली ६४वी मराठी हौशी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी राजकीय दबावापोटी अमरावतीला हलवली जाण्याची दाट शक्यता आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत होणार, असे निश्चित होते. त्यासाठी शासनाने रत्नागिरीतील नाट्यगृहदेखील आरक्षित केले. ऐनवेळी अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यासह नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाचे सदस्य अॅड. प्रशांत देशपांडे आणि अमरावती नाट्य परिषद अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर डोरले यांनी या फेरीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या शिष्टमंडळाने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांची भेट घेतली. अंतिम फेरी अमरावती येथे भरवण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यामुळे राजकीय वजन वापरून ही स्पर्धा रत्नागिरीतून अमरावतीला पळवली जाण्याची भीती नाट्यकर्मींमधून व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री उदय सामंत स्वतः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आहेत. राज्याचे मराठी भाषा मंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात येणारा हा बहुमान टिकावा, अशी नाट्यप्रेमींची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्री सामंत यांनी आपली ही स्पर्धा रत्नागिरीतच होईल, यासाठी ताकद लावावी, अशी मागणी नाट्यप्रेमींमधून केली जात आहे. महाराष्ट्रातून निवडक विजेती ५२ नाटके अंतिम फेरीत धडकली आहेत. ही सर्वोत्कृष्ट नाटके पाहण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना मिळू शकते; मात्र, जर ही स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी झाली, तर रसिक प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे.
-----
कोट १
दरवर्षी शासनाच्या संगीत-गद्य राज्य नाट्यस्पर्धेचा प्रतिसाद पाहता, रत्नागिरीत गद्य नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी व्हावी, अशी सर्व रसिक प्रेक्षकांची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते; पण अमरावती या ठिकाणी जर अंतिम नाट्यस्पर्धा होत असेल, वळवण्यात येत असेल तर ते आमचे दुर्दैव आहे.
- दत्ता केळकर, ज्येष्ठ रंगकर्मी
कोट २
स्पर्धेचे ठिकाण जाहीर झालेले नाही; परंतु संगीत व गद्य नाट्यस्पर्धेला होणारी गर्दी पाहता, ही स्पर्धा रत्नागिरीत व्हावी, अशी मागणी आम्ही मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्याकडे केली आहे. संगीत नाट्यस्पर्धा कायम हाऊसफुल्ल होते, तर नुकत्याच गद्य नाट्यस्पर्धेतील १८ पैकी ५ नाटके हाऊसफुल्ल झाली होती, तसेच अन्य नाटकांना कमाल ५०० प्रेक्षकही हजर होते. त्यामुळे अंतिम स्पर्धेच्या आयोजनाची संधी रत्नागिरीला मिळाली पाहिजे.
- समीर इंदुलकर, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

