खेड-विन्हेरे-नातूनगरमधील १३५ शेतकरी मोबदल्यापासून वंचित
10866
विन्हेरे, ताम्हणे शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
१३५ शेतकरी २० वर्षांपासून भरपाईच्या प्रतीक्षेत; रस्त्यासाठी केले होते भूसंपादन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीघाट २००५ मधील नैसर्गिक आपत्तीवेळी वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून विन्हेरे-तुळशीखिंड-नातूनगर रस्ता विकसित केला गेला. त्या रस्त्यासाठी विन्हेरे, ताम्हणे आणि फाळकेवाडी येथील १३५ शेतकऱ्यांची जमीन तातडीने संपादित केली होती; परंतु २० वर्षांनंतरही त्या शेतकऱ्यांना भरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शासनाच्या ५ ऑक्टोबर २००५ च्या निर्णयानुसार भूसंपादनासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र आजवर संयुक्त मोजणीही झालेली नाही आणि भरपाईही मिळालेली नाही, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. संपादित जमिनीतील आंबा, काजू, जांभूळ यांसह इतर फळझाडांचे नुकसान तसेच पाडलेली घरे व गोठे, वीस वर्षांचे भूभाडे या कोणत्याही बाबींचा सार्वजनिक बांधकाम विभागाने विचार केलेला नाही. दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद होईल, असे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात काहीही न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. जमिनी संपादित करूनही त्याचा बाजारभावानुसार मोबदला दिला गेला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, संपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासनाकडे प्रस्ताव पाठवला गेला आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. येथील भूसंपादनाचा हा प्रश्न लालफितीत अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट १
राज्यमार्ग बंद पाडणार
बाजारभावानुसार संपादित जमिनीचा मोबदला जाहीर करावा, नष्ट झालेल्या वृक्षसंपत्तीचे स्वतंत्र मूल्यांकन करून भरपाई द्यावी, संयुक्त मोजणी तातडीने करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करावी, या मागण्या शेतकऱ्यांनी शासनापुढे ठेवलेल्या आहेत. त्यांची आठ दिवसांत पूर्तता न झाल्यास विन्हेरे–तुळशीखिंड–नातूनगर राज्यमार्ग बंद करून मोठे आंदोलन करू, असा इशारा तीन गावांच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
कोट १
शासनस्तरावर ३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत; परंतु भूसंपादनाचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता. त्यांनी दिलेल्या काही निवडक मुद्द्यांमुळे तो पुन्हा दुरूस्तीसाठी परत पाठवण्यात आलेला आहे. दुरूस्ती करून तो प्रस्ताव तालुकापातळीवरून वरिष्ठांकडे पुन्हा सादर केल्यानंतर काही महिन्यातच मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागेल.
- डी. वाय. पवार, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

