परबवाडा कणकेवाडीत लोकसहभागातून बंधारा
10843
परबवाडा कणकेवाडीत
लोकसहभागातून बंधारा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून परबवाडा-कणकेवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा बांधला. उन्हाळ्यात होणारी पाण्याची टंचाईची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी गणेश कोंड या ठिकाणी हा बंधारा बांधला. या भागातील ग्रामस्थांना मेमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी दरवर्षी येथे वनराई बंधारा बांधला जातो. या बंधाऱ्यामुळे परबवाडा तसेच उभादांडा गावाला देखील पाणीसाठा वाढण्यास मदत होते. यावर्षी या सामाजिक उपक्रमासाठी परबवाडा सदस्य हेमंत गावडे, जीवन परब, संजय तेरेखोलकर, हरिश्चंद्र मांजरेकर, प्रमोद नाईक, सचिन गवंडे, हर्षल मळगावकर, साहिल मळगावकर, जालंदर मांजरेकर, प्रसाद मांजरेकर, नीलेश कोनाडकर, संभाजी पिंगुळकर, उत्तम कासकर, आयुष मांजरेकर, वेदांत गावडे, पार्थ सावंत, युवराज नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
..................
10844
डॉ. नेहा आरोलकर यांना
पीएच.डी. पदवी प्रदान
वेंगुर्ले, ता. १५ ः भटवाडी येथील डॉ. नेहा आरोलकर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून डॉ. जी. एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भाजीपाला विज्ञान’ या विषयात पीएच.डी मिळविली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नुकताच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा २७ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या समारंभाप्रसंगी कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवरत, प्रतिकुलपती तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय, परभणी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्रमणी यांच्या उपस्थितीत डॉ. नेहा यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी देशभरातील अनेक नामांकित वैज्ञानिक आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. डॉ. नेहा यांनी अकोला पंजाबराव देशमुख महाविद्यालयामधून एम.एस.सी. तर आता परभणी वसंतराव नाईक विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

