अलोरेतील शिबिरात ८१३ जणांची तपासणी
अलोरेतील शिबिरात
८१३ जणांची तपासणी
चिपळूणः लायन्स क्लब ऑफ मुंबई सांताक्रुझ ईस्ट यांनी अलोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना डोळ्यासमोर ठेवून शासकीय रुग्णालयात आरोग्य व नेत्रतपासणी दोन दिवसीय शिबिर घेतले. लाइफ केअर आणि नॅब चिपळूण यांच्याकडील अनुभवी डॉक्टरकडून सर्व तपासणी झाली. एकूण ८१३ रुग्णांची तपासणी झाली. ६६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सहकार्य करण्यात येणार आहे शिवाय ५८४ व्यक्तींना चष्मा वाटप करण्यात आले. लायन्स क्लब सांताक्रुझ अध्यक्ष रमेश चव्हाण, सचिव मनमोहन गुप्ता, सुधाकर कांबळे, मारसियन अल्वास आदी उपस्थित होते. पेढांबे सरपंच विजया पेढांबकर यांनी शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
----------
शिर्के विद्यालयात
वन्यजीव मार्गदर्शन
चिपळूण ः तालुक्यातील भोम येथील महादेवराव शिर्के माध्यमिक विद्यालयात वन्यजीव संरक्षण व संवर्धन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम झाला. रत्नागिरी वनविभागाच्या सहकार्याने व चिपळूण वनपरिक्षेत्रातील सेवाभावी उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव प्रशांत शिर्के यांच्या हस्ते वाइल्डलाईफ एज्युकेअर, गुजरात येथील तज्ज्ञ राहुल भागवत व नीशा भागवत यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी डिजिटल कक्षात स्लाईड शोच्या माध्यमातून वन्यजीव विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कोकणातील समृद्ध निसर्गसंपदा व प्राणीवैविध्य, देश-विदेशातील पक्ष्यांचे स्थलांतर, त्यांची प्रजनन प्रक्रिया तसेच निसर्गातील सहचर्य याबाबत माहिती देण्यात आली. निसर्गातून हळूहळू हद्दपार होत असलेल्या पशुपक्षांचे संवर्धन कसे करता येईल, पर्यावरण संरक्षणातून पर्यटन व रोजगार निर्मितीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
-------
डीबीजेत २१ पासून
उडान महोत्सव
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयात उडान युवा मनाची हा सांस्कृतिक महोत्सव २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २१ ला सकाळी आठ वा. ग्रंथदिंडीने उडान महोत्सवाचा प्रारंभ होईल. याच दिवशी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होईल. कार्यक्रमाला ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. हॉस्पिटलचे माजी डीन डॉ. तात्याराव लहाने व लेफ्टनंट कर्नल सुरेश शिंदे (निवृत्त) उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वा. एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. तिसरी घंटा नाट्य आविष्कार यामध्ये नावाजलेल्या एकांकिका सादर करण्यात येणार आहेत. २२ ला सांस्कृतिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होईल. या वेळी अभिनेत्री, शास्त्रीय गायिका वेदवती केतकर-परांजपे, मयुरा पालांडे उपस्थित राहणार आहेत. २३ ला ‘जिमखाना डे’ साजरा करण्यात येणार आहे. २४ ला वार्षिक पारितोषिक वितरण होईल.

