गोव्यात दारूबंदी; सिंधुदुर्गातील तळीरामांची ‘पंचायत’

गोव्यात दारूबंदी; सिंधुदुर्गातील तळीरामांची ‘पंचायत’

Published on

11079

गोव्यात दारूबंदी; सिंधुदुर्गातील तळीरामांची पंचाईत

निवडणूक पार्श्वभूमी; १९ पासून तीन दिवस निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः गोव्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात १९, २० आणि २२ डिसेंबरला दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. नगरपालिका हद्द व पणजी महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये हे आदेश लागू राहणार आहेत. मतदान व मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दारुसाठी गोव्यावर अवलंबून असलेल्या तळीरामांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
गोव्यात स्वस्त व सहज दारू उपलब्ध होते. त्यामुळे या दारूला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत मोठी मागणी असते. त्यामुळे तळीरामांची पावले आपसूकच गोव्याकडे वळतात. मात्र, १९, २० आणि २२ डिसेंबरला दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश गोवा प्रशासनाने जारी केले आहेत. गोव्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. या काळात बार अँड रेस्टॉरंट परवाना असलेल्या आस्थापनांना केवळ खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेस्टॉरंटचा भाग सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, बार काउंटर पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक असून दारूविक्रीस सक्त मनाई केली आहे. तसेच ‘येथे दारूविक्री होत नाही, केवळ रेस्टॉरंट सुरू आहे,’ असा फलक लावणे आदेशात अनिवार्य केले आहे. परवानाधारकांनी आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा तत्काळ परवाना रद्द करण्यासह आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, गोव्याच्या सीमेवर दारूविक्री बंद असल्याने जिल्ह्यातील दारू शौकिनांची चांगलीच पंचाईत होणार असल्याची चर्चा आहे. नेहमी गोव्यावर अवलंबून असणाऱ्या तळीरामांना या तीन दिवसांत पर्याय शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
--------------
चोरट्या दारू वाहतुकीला वेग
गोव्यात तीन दिवस दारूबंदी असल्याने या काळात चोरट्या दारू वाहतुकीला वेग येणार आहे. या आठवडाभरातही चोरट्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई झाली आहे. त्यात वर्षाखेर असल्याने दारूला वाढती मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. २१ ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ पालिका व १ नगरपंचायतीचा निकाल लागणार असल्याने या काळातही दारूची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर पोलिस, तसेच उत्पादन शुल्क विभागाला जागता पहारा ठेवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com