जिल्ह्यात ‘बीएसएनएल’ समस्यांच्या गर्तेत
जिल्ह्यात ‘बीएसएनएल’ समस्यांच्या गर्तेत
ग्राहकांमध्ये नाराजी; मोबाईल, ‘वाय-फाय’ सेवा सुधारण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ : संपर्कासाठी प्रभावी माध्यम म्हणून ज्याकडे पाहिले जाते, अशी ‘बीएसएनएल’ मोबाईल सेवा सध्या वारंवार समस्यांच्या गर्तेत सापडत असल्याचे चित्र आहे. वारंवार प्रयत्न करूनही कॉल न लागणे, बोलणे सुरू असताना अर्धवट कॉल बंद होणे, एकतर्फी संभाषण होणे, अशा विविध समस्यांमुळे तालुक्यातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. ‘बीएसएनएल’ ‘वाय-फाय’ सेवाही अधूनमधून ढेपाळत असल्याने ग्राहक आता खासगी कंपन्यांच्या सेवेकडे वळत असल्याचे चित्र आहे.
एकेकाळी ‘बीएसएनएल’ लॅंडलाईन फोनसाठी अधिक मागणी असे. घरात फोन असणे प्रतिष्ठेचे मानले जात असे. मात्र, गावपातळीवर मोबाईलचे जाळे विस्तारले आणि लॅंडलाईन फोनची ‘क्रेझ’ कमी झाली. संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून मोबाईलचा सर्रास वापर सुरू झाला. गावागावांत मोबाईल मनोरे उभे राहिले आणि ग्राहक संख्या झपाट्याने वाढत गेली. शहरातील नेटवर्कमध्ये सुधारणा होत गेली आणि जलद नेटवर्क सुविधा पुरवली जाऊ लागली. दरम्यानच्या काळात खासगी मोबाईल सेवेनेही आपले जाळे विस्तारले. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातही ‘बीएसएनएल’सह विविध खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत; मात्र कालांतराने ‘बीएसएनएल’ लॅंडलाईन सेवा कमी होऊन मोबाईल ग्राहक संख्या वाढली, तरीही सद्यःस्थितीत ‘बीएसएनएल’च्या सेवेमुळे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. वारंवार प्रयत्न करूनही कॉल न लागणे, बोलणे सुरू असताना अर्धवट स्थितीत कॉल बंद होणे, एकतर्फी संभाषण होणे, नेटवर्क मध्येच जाणे अशा विविध समस्यांमुळे तालुक्यातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. सक्षम मोबाईल सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. पर्यायाने ग्राहक खासगी सेवेकडे वळत आहेत. ‘बीएसएनएल’ची ‘वाय-फाय’ सेवाही कुचकामी ठरत असल्याने काहींनी ही सेवा बंद करून खासगी सेवेकडे धाव घेतली आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’ची सेवा सुधारण्याची आवश्यकता बनली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना मोबाईल नेटवर्क समस्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सेवा सुधारण्याची मागणी केली जात आहे.
............................
ग्राहकांना परवडणारी मोबाईल सेवा
स्वस्त मोबाईल सेवा म्हणून ‘बीएसएनएल३ सेवेला ग्राहकांचे प्राधान्य असते; मात्र अलीकडे मोबाईल रिचार्जचे वाढते दर पाहता सर्वसामान्य ग्राहकांना ‘बीएसएनएल’ परवडेनासे झाले आहे. खासगी मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज दर वाढवल्याने आता ‘बीएसएनएल’ची तशीच अवस्था होऊ लागल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे.
---
देवगड तालुक्यातील बीएसएनएलची सेवा अधूनमधून कोलमडते. त्यामुळे संपर्कामध्ये अडचणी येतात. गरजेच्यावेळी वारंवार प्रयत्न करूनही फोन लागत नाहीत. बोलणे मध्येच बंद पडणे, एकतर्फी संभाषण होणे, असे प्रकार घडतात. बीएसएनएलची फोरजी सेवा सुरू झाल्याचे संदेश येतात. मात्र, सद्यस्थितीत आहे ती सेवा नीट नाही. लोकांनी कंटाळून लॅंडलाईन बंद केले. वायफाय सुविधाही सक्षम नाही. आता तर रिचार्ज दर वाढल्याने अनेक ग्राहक खासगी सेवेकडे वळत आहेत.
- शैलेश कदम, अध्यक्ष, देवगड तालुका व्यापारी संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

