रत्नागिरी- दुबईत १० किमी पोहून राहुल भोसले बनले ओशनमॅन
rat16p23.jpg-
11062
दुबई : रत्नागिरीतील पहिले ओशनमॅन किताब मिळवणारे राहुल भोसले.
---------
दुबईतील स्पर्धेत राहुल भोसले बनले ओशनमॅन
निर्धारित वेळेत १० किमीचा गाठला पल्ला; लाटा, अनिश्चित प्रवाहाचा आव्हानात्मक सामना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : वेगाने उसळणाऱ्या लाटा अणि समुद्रातील अनिश्चित प्रवाह यांचा आव्हानात्मक सामना करत, १० किमी समुद्रात पोहून येथील बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांनी ‘ओशनमॅन’ हा किताब पटकावला. प्रत्येक लाट एक आव्हान होती आणि प्रत्येक श्वास आत्मविश्वास देणारा होता. त्यांनी १० किमीचा पल्ला निर्धारित वेळेत पूर्ण करत ओशनमॅन किताब पटकावला. दुबई येथे झालेल्या ओशनमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. बुर्ज अल अरब येथील काईट बीचवर ही स्पर्धा आयोजित केली होती. जगभरातून ६०पेक्षा अधिक देशांतून स्पर्धक सहभागी झाले होते.
ओपन वॉटर स्विमिंग म्हणजेच समुद्री जलतरण. ही जगभरातील प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. सातासमुद्रापार जाऊन अरेबियन समुद्रामध्ये पोहण्याचा पहिलाच अनुभव भोसले यांनी घेतला. इतर स्पर्धक दोन दिवस आधी त्या समुद्रामध्ये सराव करत होते; पण मी उशिरा निघाल्यामुळे मला सराव करणं शक्य झालं नाही. त्यामुळे मनावर थोडं दडपण असल्याचं ते म्हणाले. गणपती बाप्पा मोरया म्हटले आणि त्यांनी पोहायला सुरवात केली.
भोसले म्हणाले, सरावादरम्यान, डॉ. नितीन यांनी ओशनमॅन या स्पर्धेबद्दल कल्पना दिली आणि विचार कर, असा सल्ला दिला. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक होतो. त्यामुळे त्यांनी कोणाशी चर्चा करण्यापूर्वीच उत्साहात नोंदणीही केली. सराव सुरू केला. निश्चय:च्या डॉ. नितीन यांच्यासोबत जलतरण प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या समुद्रात पोहण्याचा सराव सुरू झाला. गोव्याच्या स्पर्धेत नोंदणी केली; मात्र ही स्पर्धा रद्द होऊन ती दुबईत ठरली. त्यामुळे पुन्हा नोंदणी करून सराव सुरू केला. त्याचा उपयोग झाला.
चौकट १
डॉ. सनगर, विलणकरांचे मार्गदर्शन
भोसले यांना लहानपणापासूनची पोहण्याची आवड, गावातील विहिरीपासून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. यापूर्वी ३ व ५ किमी समुद्री स्पर्धा पूर्ण केल्यानंतर काही काळ फिटनेसपासून दूर गेले होते; मात्र डॉ. नितीन सनगर यांची भेट झाली आणि पुन्हा फिटनेस प्रवास सुरू झाला तसेच अभिजित पड्याळसारखा प्रोत्साहन देणारा मित्र मिळाला. जलतरण प्रशिक्षक विवेक विलणकर, कोकण कोस्टल टीम, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्यांच्या ओळखीमुळे एकत्रित प्रवास सुरू झाला. त्यामुळे मॅरेथॉन, ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये ते सहभागी होऊ लागले.
कोट
ओशनमॅन होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याचा आनंद होताच, थोडा भावुक झालो. कुटुंबासोबत बोललो. त्यांना पहिल्यांदा स्पर्धा पूर्ण केल्याची माहिती दिली. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं. माझी पत्नी, मुलं, आई-वडील यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. हा विजय फक्त माझा नाही तो माझ्या कुटुंबाचा, मार्गदर्शकांचा आणि रत्नागिरीचा आहे. कोणतीही स्पर्धा फक्त निमित्त असते. तुमच्यामधील क्षमतेची ओळख करून देणारे साधन आहे. शरीर निरोगी ठेवा, आव्हाने स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करा.
- राहुल भोसले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

