संगमेश्वर-रस्ता नाही, तर मतही नाही

संगमेश्वर-रस्ता नाही, तर मतही नाही

Published on

rat16p24.jpg-
11064
संगमेश्वर ः संभाजीनगर येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने खाचखळग्यातून वृद्ध, अपंग नागरिकांना जावे लागते. (संग्रहित छायाचित्र)
-----------
रस्ता नाही तर मतही नाही
संगमेश्वर संभाजीनगरमधील ग्रामस्थांचा इशारा; निवडणुकीवर बहिष्कार, अपंगांना दिलेल्या व्हीलचेअर दिखाऊ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ः संगमेश्वर तालुक्यातील नावडी-संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्ता नसेल तर मत नाही, असा थेट इशारा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दिला आहे. गेली ३० ते ४० वर्षे केवळ आश्वासनांच्या भरोशावर जगणाऱ्या या वस्तीत आजही पक्का रस्ता नसणे ही बाब केवळ दुर्लक्षाची नसून माणुसकीलाच काळीमा फासणारी असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या वस्तीत सुमारे ५००पेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास असून, मुख्य रस्त्यापासून वस्तीत जाण्यासाठी आजही एकही पक्का रस्ता उपलब्ध नाही. नागरिकांकडे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने असली तरी ती सुमारे ५०० मीटर अंतरावर थांबवावी लागतात. पुढील प्रवास दगडधोंडे, खाचखळगे व अरूंद वाटांमधून जीव धोक्यात घालून करावा लागतो.
रस्त्याअभावाचा सर्वाधिक फटका अपंग नागरिकांना बसत आहे. वस्तीत पाच ते सहा अपंग व्यक्ती वास्तव्यास असून, काहींना शासनाकडून व्हीलचेअर देण्यात आल्या आहेत; मात्र रस्ता नसताना या व्हीलचेअर केवळ दिखाऊ मदत ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असूनसुद्धा तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसणे ही सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची थट्टा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आंबेडकरांच्या नावाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चिखल व धोकादायक वाटेने प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाची संवेदनशून्यता स्पष्ट होत आहे. ग्रामस्थांनी पंचायत समितीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेकवेळा धाव घेतली. आमदार, खासदार व स्थानिक नेत्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने मतपेटी बंद होताच विसरली गेल्याचा आरोपही येथील ग्रामस्थ गणेश पवार, राजेंद्र नलावडे, श्रीरंग शिंदे आदींनी केला आहे. त्यामुळे आता आश्वासन नको, रस्ता हवा, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर नावडी ग्रामपंचायत सदस्य गणेश शंकर पवार, राजेंद्र शिवाजी नलावडे, श्रीरंग दगडू शिंदे, अशोक जाधव, राजा जाधव आदींच्या सह्या आहेत.

चौकट
अपंग, वृद्धांना डोलीतून न्यावे लागते
आजारी अपंग नागरिक किंवा वृद्धांना रुग्णालयात नेणे हे आणखीनच कठीण ठरते. वाहन घरापर्यंत पोहोचू शकत नसल्याने आजही डोलीचा आधार घ्यावा लागतो, ही बाब आधुनिक भारतात प्रशासनासाठी लज्जास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

चौकट
विद्यार्थ्यांचे पावसाळ्यात हाल
शालेय विद्यार्थ्यांचे हालही कायम आहेत. दररोज लहान मुले चिखलातून व घसरत्या वाटांवरून जीव मुठीत धरून शाळेत जातात. पावसाळ्यात अनेकवेळा मुले घसरून जखमी होतात. शिक्षणाचा गजर करणाऱ्या शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com