संगमेश्वर-राज्य संरक्षित महिमतगड संवर्धनाच्या प्रतिक्षेत

संगमेश्वर-राज्य संरक्षित महिमतगड संवर्धनाच्या प्रतिक्षेत

Published on

rat16p25.jpg-
11102
महिमतगड किल्ल्यावरील गढीची स्थिती.
rat16p26.jpg-
11103
गवत वाढल्यामुळे तोफाही झाकल्या गेल्या आहेत.
rat16p27.jpg-
11110
दुर्गवीर प्रतिष्ठानने केलेल्या स्वच्छतेनंतर गडावर जाणाऱ्या वाटा स्वच्छ झाल्या आहेत.
------------

राज्य संरक्षित महिमतगडाची दूरवस्था
संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष; डागडुजी केल्यास पर्यटनवृद्धीला चालना, दुर्गवीरांकडून स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ ः सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये अनेक गडकिल्ले इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. त्यातील संगमेश्वर तालुक्यातील महिमतगड किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालेला असतानाही त्याचे जतन आणि संवर्धन झालेले नाही. शासनाचे दुर्लक्ष होत असून, पुरातत्व विभागाने या किल्ल्याची डागडुजी करावी आणि पर्यटनवृद्धीला चालना द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावर वाढलेली झाडेझुडपे तोडून साफसफाई करण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत मोहीम राबवण्यात आली होती.
महिमतगड किल्ल्यावरील ९ बुरूजांपैकी फक्त ३ बुरूज शिल्लक आहेत. त्याचीही पूर्णपणे पडझड झालेली आहे. उर्वरित ६ बुरूज पूर्णपणे ढासळले आहेत. किल्ल्यावर वाढलेली झाडी, उत्खनन आणि देखभालीअभावी किल्ल्याचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहेत. महिमतगडाचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार, पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या, खांबटाकी, घोडे तलाव यासारख्या वास्तू अजूनही इतिहासाची आठवण करून देतात; मात्र त्यांची दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर जाणारा रस्ता कच्चा असून, अनेक ठिकाणी खचला आहे. पर्यटक आणि दुर्गप्रेमींना किल्ल्यापर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे. रस्ता खराब असल्याने पायथ्यापर्यंत पोहोचायलाच मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळे राज्य संरक्षित घोषित असूनही हा किल्ला आजही पर्यटकांना अपरिचित आहे. संगमेश्वर तालुक्यातील महिमतगड हा डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याच्या उत्तरेला कुंडी तर पूर्वेला निगुडवाडी ही गावे आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर दोन बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तटबंदीला लागून एक तलाव आहे; परंतु त्या तलावाला गळती लागल्यामुळे पाणीसाठा होत नाही. डाव्या बाजूला कातळात खोदलेली एक खांबी टाकी लागते. त्यामध्ये पाणीसाठा आहे. पायऱ्या चढून गेल्यावर दुसरा दरवाजा दिसतो. या दरवाजाची कमान मात्र शिल्लक नाही; पण दरवाजाची कमान पेलणारे खांब आजही दरवाजा असल्याच्या खुणा दर्शवतात. हा दरवाजा उत्तराभिमुख असून, मुख्य दरवाजापासून ३० फूट उंचीवर आहे. रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर डावीकडे एक तलाव बांधलेले आहे. याला घोडे तलाव असे म्हणतात. मंदिरात शंकराच्या पिंडीवर छत म्हणून सध्या ॲस्बेस्टसचा पत्रा लावलेला आहे.
महिमतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत महिमतगडावर २०१९ ते २०२३ दरम्यान स्वच्छता व श्रमदानाच्या अनेक मोहिमा राबवून अनेक वास्तू उजेडात आणण्याचे कार्य करण्यात आले होते. त्याचबरोबर शिवजयंती, दसरा म्हणजेच विजयदुर्गोत्सव हे सण साजरे करण्यात आले आहेत. स्थानिक गावकऱ्यांच्या माध्यमातून या मोहिमा करण्यात येतात. आताच २३ नोव्हेंबरला जागतिक वारसासप्ताह निमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत महिमतगड ऐतिहासिक भ्रमंतीचे आयोजन केले होते. २३ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग घेतला होता.

कोट
महिमतगड किल्ल्यावर गेल्यानंतर पूर्णगड भ्रमंती करता आली नाही, याची खंत आहे. या गडावरील वास्तूंना पाहण्यासाठी जाणे शक्य नव्हते. वाढलेल्या गवतात आणि झाडीझुडपात पायवाटा हरवल्या होत्या. पायऱ्या, बुरूज, वास्तूंना झाडाझुडपांनी वेढलेले होते. हे सर्व पाहून मनाला खूप वाईट वाटत होते. या किल्ल्याकडे जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी संवर्धन करून गडाला नवसंजीवनी देण्यासाठी स्थानिक गावकरी पूर्ण पडू शकत नाहीत. त्यांना सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन कार्य करावे लागेल. पुरातत्व विभागाने स्थानिक ग्रामस्थ आणि दुर्गवीरसारख्या गडसंवर्धन करणाऱ्या संस्थेचा समन्वय कसा साधता येईल यासाठी पुढाकार घेऊन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे.
- प्रशांत डिंगणकर, उपखजिनदार, दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com