कर्णबधीर मुलाच्या आयुष्यात पसरले नवे सुर
कर्णबधीर मुलाच्या आयुष्यात पसरले नवे सुर
मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ अंतर्गत मिळाले उपचार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ : जन्मत: ऐकू न येणाऱ्या तोंडवली (ता. मालवण) येथील सुमारे एक वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात आता नवे सुर पसरले आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत वेळेवर निदान, समुपदेशन आणि शासकीय सहकार्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्याच्यावर कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्राथमिक सहकार्य लाभले.
येथील आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, तोंडवली (ता. मालवण) येथील एका कुटुंबातील लहान मुलाचे आई-वडील दोघेही कर्णबधीर असल्यामुळे सुरुवातीला शस्त्रक्रियेसाठी ते मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. मात्र, आरबीएसके टीम, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे अखेर कुटुंबाचा विश्वास मिळवण्यात यश आले.
प्रथम ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मुंबई यांच्या समन्वयाने कान - नाक -घसा प्रवर्गातील ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी तपासणी शिबीरात लहान मुलामध्ये श्रवणदोष असल्याचे निदान झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासणीचे नियोजन करण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटोदेकर यांच्या परवानगीने १०२ रुग्णवाहिकेद्वारे त्याला कुडाळ महिला रुग्णालयात पाठवले. तेथील तपासणीनंतर डॉक्टरांनी कोक्लिअर इम्प्लांटचा सल्ला दिला. यापूर्वी तालुक्यातील आरबीएसके टीम क्रमांक २ मार्फत झालेल्या तपासणीत डॉ. रुपाली पोकळे व डॉ. अमित कोळी यांनी त्याच्यामधील श्रवणदोष निश्चित केला होता. त्यानंतर डॉ. पोकळे, डॉ. कोळी औषध निर्माण अधिकारी नीलेश जोग, श्रीमती लब्दे तसेच तोंडवली उपकेंद्रातील श्रीमती धनश्री धोतरे यांनी वारंवार समुपदेशन करून आई आणि आजी यांना शस्त्रक्रियेसाठी तयार केले. सप्टेंबरमध्ये मुंबई येथील शस्त्रक्रिया पथकाने ही शस्त्रक्रिया केली. सुमारे साडेआठ लाख रुपये या शस्त्रक्रियेसाठी लागले असते. मात्र, शासनाच्या योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया झाली. सध्या मुलाची प्रकृती स्थीर असून त्याला हियरिंग एड दिले आहे. पुढील स्पीच थेरपी व ऑडिओलॉजी फॉलोअप सुरू आहेत.
-------------
कोट
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे लवकर निदान होऊन अशा बालकाचे भवितव्य उज्ज्वल झाले आहे. ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने जीवन बदलणारी ठरत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आरोग्य विभाग, आरबीएसके टीम आणि प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेली तत्परता ही शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे उदाहरण आहे. या सर्व प्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक देवगड टीम दोन यांना जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांचे मार्गदर्शन मिळाले.
- डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

