निःपक्षपाती निर्णय हे पंचाचे कौशल्य
11131
निःपक्षपाती निर्णय हे पंचाचे कौशल्य
शुभदादेवी भोसले ः सावंतवाडीत जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः कबड्डी हा देशी खेळ आहे. कबड्डी पंच हा सामन्यावर तासन् तास उभा राहून अचूक व निःपक्षपाती निर्णय देण्याचे काम करतो. हे काम खूप कठीण आणि कौशल्याचे आहे. कबड्डीचे कार्य असेच जोमात सुरू ठेवा. राजघराण्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन शुभदादेवी भोसले यांनी केले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनतर्फे जिल्हास्तरीय पंच शिबिर उत्साहात झाले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे संचालक तथा ज्येष्ठ मार्गदर्शक जयप्रकाश सावंत, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनेश चव्हाण, प्रा. संदीप पाटील, प्रा. योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात जवळपास ५० जिल्हा व राज्य पंच सहभागी झाले होते. यात नुकतेच जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हा पंच परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम आलेले पराग वालावलकर, द्वितीय आनंदा बामणीकर व तृतीय संदीप शेळके, मिलिंद निकम यांना शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते सन्मानित केले.
श्री. पिंटो यांनी, पंचांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ‘माय’ ही त्यांची प्रसिद्ध कविता प्रस्तुत करून उपस्थितांची वाहवा मिळविली. एकदिवशीय शिबिरामध्ये राष्ट्रीय पंच प्रशांत वारीक, प्रीतम वालावलकर, राज्य पंच किशोर पाताडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, सी. ए. नाईक, राष्ट्रीय पंच मधुकर पाटील, जिल्हा पंच मिलिंद निकम यांचे विशेष सहकार्य लाभले.
---
कबड्डी खेळाचा महाभारतात उल्लेख
शुभदादेवी भोसले म्हणाल्या, ‘कबड्डी खेळाचा महाभारतात प्रामुख्याने उल्लेख आहे. पूर्वी मैदानी खेळांना व परंपरांना प्रामुख्याने राजाश्रय दिला जात असे. सावंतवाडीच्या राजघराण्याने कोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि क्रीडा यांचे जतन व संवर्धन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सावंतवाडी संस्थानाच्या आश्रयामुळे दशावतार ही कोकणातील पारंपरिक कला टिकून राहिल्या व विकसित झाल्या. क्रीडांमधून शिस्त, धैर्य व नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला.’

