दापोली-आयुष्मान भारतचा स्वतंत्र कक्ष
दापोलीत आयुष्मान भारतचा स्वतंत्र कक्ष
डॉ. ओमप्रकाश शेटयेः आरोग्यसेवेत बदल घडवण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ः पैशाअभावी उपचार रखडू नयेत आणि कोणाचाही जीव जाऊ नये, या उद्देशाने दापोलीत आयुष्मान भारत योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती आयुष्मान भारतचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी दिली. दापोली उपजिल्हा रुग्णालयाला दिलेल्या सरप्राईज भेटीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.
डॉ. शेट्ये यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांची सखोल पाहणी करून आरोग्यसेवा, स्वच्छता, रुग्णांना दिले जाणारे जेवण तसेच उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता व आहारव्यवस्था समाधानकारक असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला; मात्र रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, टेक्निशियन तसेच आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांच्या पाहणीत स्पष्ट झाले.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसलेले उपचार गरज भासल्यास खासगी रुग्णालयात करून त्याचा खर्च शासन उचलेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व नागरिकांनी आयुष्मान भारतचे कार्ड काढावे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
दापोली हे पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ उपचार मिळावेत, या दृष्टीने आयुष्मान कक्ष उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. शेट्ये यांनी नमूद केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० बेडच्या विस्तारित इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
चौकट
आरोग्यमित्र सेवकावर कारवाईचे आदेश
या वेळी अनुपस्थित असलेल्या आरोग्यमित्र सेवकावर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले तसेच रखडलेल्या बांधकामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश रुग्णालय अधीक्षक डॉ. पवन सावंत यांना देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील शिवभजन कक्षाला भेट देऊन डॉ. शेट्ये यांनी कक्षचालक बाळू भळगट व त्यांच्या टीमचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

