जिल्हा बँकेच्या कर्ज 
वितरणात घोळ ः तेली

जिल्हा बँकेच्या कर्ज वितरणात घोळ ः तेली

Published on

11150

जिल्हा बँकेच्या कर्ज
वितरणात घोळ ः तेली

मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चार वर्षांत कर्ज वितरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केला. यावेळी त्यांनी कर्ज वितरणाबाबत अनियमिततेची विविध उदाहरणे देत दावे केले.
येथील आपल्‍या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. तेली म्हणाले, ‘भोगवे येथील जमिनीचा व्यवहार जानेवारीत झाला. खरेदीखतात कर्जाचा उल्लेख नाही; मात्र मार्चमध्ये मॉरगेज झाले. शासकीय दरानुसार जमिनीची किंमत ८८ लाख असताना खरेदीखत १० कोटींना झाले. त्यावर वेगवेगळ्या माध्यमांतून ५९ कोटींचे कर्ज दिले गेले. पहिले कर्ज तारण गहाणखतापूर्वी देण्यात आले. वास्तविक जमीन घेणाऱ्याच्या नावे कर्ज द्यायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे हे खरेदीखत संशयास्पद आहे.’
ते म्हणाले, ‘वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील एका गोठ्याची किंमत ३१ कोटी दाखवली आहे. याच गोठ्याला तारण ठेवून शेतमालासाठी कर्ज किंमतीपेक्षा कित्येक पटीने जास्त दिले गेले. घरपत्रक उताऱ्यानुसार आधीच ५ कोटींचा बोजा असतानाही ड्रेझरसाठी ३६ कोटींचे कर्ज दिले आहे. अशाच प्रकारे दाभोली व सासोली येथेही चुकीच्या पद्धतीने कर्ज देऊन व्यवहार झाले आहेत.’
जिल्हा बँकेत गेल्या चार वर्षांतील सर्व कर्ज व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी तेली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, ‘बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज वाटप केले आहे. ही बँकेची लूट थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे. बँकेवर प्रशासक नेमून चौकशीची मागणी करणार आहे. उचित कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सहकार खात्याने चार वर्षांच्या सर्व कर्ज व्यवहारांची चौकशी करून हा प्रकार थांबवावा व शेतकऱ्यांची बँक वाचवावी. जिल्ह्यातील २३४ पतसंस्था व हजारो सभासदांचे मोठे नुकसान होऊ शकते. आमच्याकडे या आरोपांचे पुरावे आहेत. अनेकवेळा तक्रारी केल्या, पण सहकार खाते व नाबार्डकडून कारवाई झाली नाही. संचालकांना कर्ज दिल्याप्रकरणी बँकेला यापूर्वी दोन लाखांचा दंड झाला होता.’ आमदार केसरकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘बँकेबाबत आमदार केसरकर हवेत आहेत. त्यांना कल्पना असती तर ते बोलले नसते. ते कुणाशी वैर घेत नाहीत, पण मी घाबरत नाही.’
......................
अद्याप कोणतीही नोटीस नाही
स्वतःच्या कर्जप्रकरणी तेली म्हणाले, ‘मला अजून कोणाचीही नोटीस आलेली नाही. मी कर्जफेड केली आहे. चौकशीत बोलावले तर सामोरे जाण्यास तयार आहे. जिल्हा बँक टिकली पाहिजे, अशी प्रामाणिक इच्छा आहे. अशा कर्ज वाटपामुळे सहकारी तत्त्वांना हानी पोहोचत आहे.’
---------------------
11151

कर्जाबाबतच्या रागातून
बॅंकेची नाहक बदनामी

मनीष दळवी ः आरोप सहन करणार नाही

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः राजन तेली यांनी जून २०२१ मध्ये स्वतःसह मुलगा व पत्नीच्या नावे शेतजमीन खरेदीसाठी ९ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज आपण भरणारच नाही, जिल्हा बँकेला काय करायचे ते करू दे, असे तेली जाहिरपणे सांगत होते. याबाबत नियमात नोटिसा पाठविल्यानंतर बँकेने सहकार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बँकेच्या बाजूने निर्णय दिल्याने त्यांना राग आला आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग असून हेतुपुरक माझी आणि बँकेची बदनामी करीत आहेत. तेली यांनी यात जिल्हा बँकेची बदनामी करू नये. माझ्यावर व्यक्तिगत आरोप करावेत. उत्तर द्यायला मी सक्षम आहे. त्यांनी बॅंकेवर केलेले आरोप चुकीचे आहेत. बॅंकेवर नाहक केलेल्या आरोपाविरोधात न्यायालयात जाणार आहे, असा इशारा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिला.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तेली यांनी कर्ज वितरणाच्या माध्यमातून केलेल्या आरोपांना दळवी यांनी आज येथे जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक दिलीप रावराणे, गणपत देसाई, नीता राणे, विद्याधर परब, व्हिक्टर डांटस, गजानन गावडे, महेश सारंग, प्रकाश मोर्ये, रवींद्र मडगावकर, आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, विठ्ठल देसाई आदी उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ‘सतरा वर्षांतील दोन वर्षे वगळता सातत्याने जिल्हा बँक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील संचालक काम करीत आहेत. राणे यांच्यावर विश्वास ठेवून सभासदांनी सातत्याने जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात दिली आहे. कारण त्यांचे बारकाईने बँकेवर लक्ष असते. चुकीचे काही घडू देत नाहीत. त्यामुळे जिल्हावासीय त्यांना निवडून देतात. निवडून आलेले संचालक विविध पक्षाचे आहेत. मात्र, बँक म्हणून एकविचाराने काम करतो. राणे यांच्या परवानगीने सर्व निर्णय घेत असतो. युवक, युवती, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा त्यांचा आग्रह असतो. जिल्ह्यात मोठे उद्योजक नाहीत. त्यामुळे जिल्हा बँक जिल्ह्याबाहेरील उद्योजकांना कर्ज पुरवठा करीत असते. त्यामागे कर्जाच्या माध्यमातून नफा वाढावा, हा उद्देश असतो. यासाठी जिल्हा बँक नवनवीन धोरण आणत आहे. असे असताना तेली यांनी बँकेवर केलेले आरोप ऐकल्यावर त्यांनी या बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना काय अभ्यास केला? असा प्रश्न निर्माण होतो. पहिल्या वेळी तेली यांनी अशाचप्रकारे चुकीचे आरोप केले होते. मात्र, आचारसंहिता असल्याने आम्ही त्याला उत्तर दिले नव्हते. कोल्हापूर खंडपीठाने बँकेच्या बाजूने निर्णय देत त्यांना सर्व कर्ज रक्कम भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी थकीत रक्कमेसह १५ कोटी २९ लाख ६० हजार रुपये रक्कम जिल्हा बँकेत भरले आहेत. त्यामुळे आता ते बँकेचे कर्जदार किंवा थकबाकीदार नसल्याने त्यांच्या आरोपांना उत्तर देत आहोत.’

ते म्हणाले, ‘जून २०२१ मध्ये तेली यांनी आपल्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावाने शेतजमीन खरेदीसाठी ९ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पहिली दोन वर्षे केवळ व्याज व नंतर नियमित हप्ता भरायचा होता. मात्र, त्यांनी व्याजाची रक्कमही नियमित भरणा केली नाही. यासाठी तेली यांनी विनंती केल्यावर बँकेकडे असलेले तारण गाळे विकून हप्ता भरण्यास परवानगी दिली. व्याजदर १५ टक्के होता. तो एक टक्क्याने कमी करीत १४ टक्के केला. म्हणजेच कर्ज व्याजाच्या एकूण रक्कमेत ४३ लाख २० हजार रुपयांची सवलत दिली. गाळे विकूनही तेली यांनी कर्ज रक्कम भरली नाही. २१ डिसेंबर २०२३ ला त्यांचे कर्ज ‘एनपीए’मध्ये गेले. परिणामी जिल्हा बँकेचा वर्षाचा एनपीए ८० कोटी असताना तो तेली यांच्या एकट्यामुळे ९२ कोटींवर गेला. याबाबत शासनाच्या नाबार्ड व अन्य एजन्सीकडून बँकेला विचारणा झाली. परिणामी जिल्हा बँकेने सहकार न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने तारण प्रॉपर्टी तसेच कर्ज रक्कमेच्या बदल्यात अन्य पुरेशी प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले. त्यानंतर त्यांनी न्यायालयात अपील केले. तेथे सुद्धा न्यायालयाने बँकेच्या बाजूने न्याय दिला. त्यामुळे त्याचा राग त्यांनी जिल्हा बँक आणि आपल्यावर काढला आहे. बँकेची नाहक बदनामी सुरू केली आहे. पत्रकार परिषदेत बँकेचा लोगो वापरला आहे. त्याबाबतही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. जिल्हा बँक बॅलन्सशीट पाहून कर्ज पुरवठा करीत नाही, तर विश्वासाने कर्ज पुरवठा करते. कारण ही सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची बॅंक आहे. तसे असल्यास तेली यांनाही त्यावेळी कर्ज मंजूर झाले नसते. त्यावेळीही त्यांची तेवढी पत नव्हती. जिल्ह्यात उद्योजक घडविण्यासाठी कर्ज पुरवठा सर्व नियम पाळून केले जाते. म्हणूनच जिल्हा बँकेचा एनपीए शून्य आणि क्रॉस एनपीए ३ टक्केच्या पुढे नाही. त्यांनी दरोड्याचा आरोप केला. तसे असते तर सात हजार कोटींचा टप्पा गाठला नसता. राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर जिल्हा बँकांत राहिलो नसतो.’
..........................
कर्जाबाबतचा आरोप तथ्यहीन
ठेवीदार आणि जिल्हावासीयांचा जिल्हा बँकेवरील विश्वास वाढत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप करायला वेगळे व्यासपीठ आहे. तेथे उत्तर द्यायला मी सक्षम आहे. २०२४ पासून त्यांचा सातत्याने पराभव झाला आहे. त्यामुळे तेली व्यथित होऊन आरोप करत आहेत. ज्याला चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरणाचा त्यांचा आरोप आहे, ते कर्ज मशिनरी खरेदीसाठी दिले गेले आहे. आम्ही २७ कोटींचे कर्ज दिले असून तारण म्हणून ३२ कोटींची प्रॉपर्टी घेतली आहे. खरेदी केलेल्या मशिनरी ४० कोटींच्या आहेत. बॅंक रिझर्व्ह बॅंकेच्या निकषानुसार चालते. वर्षाला पाच ऑडिट होतात. त्यामुळे तेली यांचे आरोप तथ्यहीन आहेत. यापुढे आरोपांना कायदेशीर उत्तर देऊ, असे दळवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com