खेड-कार्निव्हलमधील देखाव्यांचे खेडवासीयांना आकर्षण
कार्निव्हलमधील देखाव्यांचे
खेडवासियांना आकर्षण
एलटीटी स्कूलचे आयोजन ; ढोलताशे पारंपरिक वाद्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ : येथील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त खेड शहरातून भव्य फेरी काढण्यात आली. या कार्निव्हलमधील आकर्षक, वैविध्यपूर्ण देखाव्यांनी नागरिकांचे डोळ्यांचे पारणे फेडले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत शिस्तबद्ध आयोजन, सुरक्षिततेची काटेकोर व्यवस्था आणि नियोजनबद्ध मार्गक्रमण यांचे उत्कृष्ट दर्शन घडले. एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलने या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ शिक्षणच नव्हे तर संस्कार, संस्कृती आणि सामाजिक भान जपण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. या कार्निव्हलमध्ये पारंपरिक ढोलताशे, लेझिम, वारकरी दिंडी यांसह देशाच्या विविध क्षेत्रांतील प्रगती दर्शविणारे देखावे सादर करण्यात आले. भारतातील विविध राज्यांची संस्कृती, सामाजिक प्रबोधन करणारे संदेश तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित देखावे विशेष आकर्षण ठरले. या देखाव्यांनी उपस्थित नागरिकांची मने जिंकली आणि कार्निव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्निव्हल एलटीटी शाळेपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, वाणीपेठमार्गे गांधी चौक, सिद्धीविनायक मंदिर मार्गे पुन्हा शाळेच्या परिसरात येऊन सांगता करण्यात आली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष अहमद मुकादम, संस्था सदस्य परवेज मुकादम, माजिद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर यांच्यासह शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्निव्हलने शाळेच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीतला महत्त्वाचा ठसा उमटवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

