सातार्डातील तेरेखोल पुलाचे 
काँक्रिटीकरण पुन्हा खचले

सातार्डातील तेरेखोल पुलाचे काँक्रिटीकरण पुन्हा खचले

Published on

सातार्डातील तेरेखोल पुलाचे
काँक्रिटीकरण पुन्हा खचले

सावंतवाडी ः महाराष्ट्र व गोवा जोडणाऱ्या सातार्डा येथील तेरेखोल पुलाचे काँक्रिटीकरण सहा महिन्यांनी पुन्हा खचले आहे. पुलावर खड्ड्यांचे प्रमाणही वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तेरेखोल पुलाला पडलेल्या दरीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जूनमध्ये पुलाला पडलेल्या दरीची दुरुस्ती करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. सहा महिन्यांनंतर पुन्हा पुलावरील काँक्रिटीकरण निखळले आहे. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रिट निखळल्याने अपघात होण्याची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जूनमध्ये पुलाला पडलेल्या मोठ्या चराला काँक्रिट घातले होते. सहा महिन्यांनी रस्ता व पूल यामध्ये मोठा चर पडला आहे. हा चर व खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
........................
कलंबिस्त येथे क्रिकेट स्पर्धा
सावंतवाडी ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या संकल्पनेतून कलंबिस्त राऊळवाडी येथील श्री देव मालोबा वॉरियर्स आयोजित मालोबा चषक क्रिकेट स्पर्धा १९ ते २१ या तीन दिवसीय कालावधीत आयोजित केल्या आहेत. ‘एक गाव एक संघ’ असे या स्पर्धेचे आयोजन आहे. प्रथम पारितोषिक ३३३३३ व चषक, द्वितीय २२२२२ व चषक, तृतीय व चतुर्थ पारितोषिक तसेच इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अंतिम दिवशी पात्र झालेल्या संघाला एक आयकॉन खेळाडू खेळण्याची मुभा आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या (ता. १८) सायंकाळी ३.३० वाजता, बक्षीस समारंभ रविवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---
वेंगुर्ले हायस्कूलमध्ये उद्या बक्षीस वितरण
वेंगुर्ले ः कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या वेंगुर्ले हायस्कूल या प्रशालेच्या सभागृहात १९, २२ व २३ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात १९ ला सकाळी ९.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी संजय पुनाळेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच २२ ला सकाळी १ वाजता ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम प्रमुख पाहुणे के.सी.सी.चे मॉडरेटर रेव्ह. संजय जयकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, तर २३ ला दुपारी ४ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम प्रमुख पाहुणे तहसीलदार ओंकार ओतारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्लेचे प्रा. डॉ. वसंत नंदगिरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक एस. ए. बिडकर, पर्यवेक्षक आर. व्ही. थोरात यांनी केले आहे.
---
वेंगुर्ले येथे आज पेन्शनरांचा मेळावा
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तालुका निवृत्त कर्मचारी असोसिएशनतर्फे उद्या (ता. १८) सकाळी १० ते २ या वेळेत सुंदरभाटले येथील साईमंगल कार्यालय येथे ‘पेन्शनर्स डे मेळावा’ आयोजित केला आहे. सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रमेश पिंगुळकर व सचिव जयराम वायंगणकर यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com