शाळांमधून स्वच्छतेचा हुंकार, ‘प्लास्टिक, ई वेस्ट’ हद्दपार
11333
शाळांमधून स्वच्छतेचा हुंकार, ‘प्लास्टिक, ई-वेस्ट’ हद्दपार
‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी मोहीम; सहा हजार किलो कचरा संकलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः सिंधुदुर्गला प्लास्टिकमुक्त जिल्हा करण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वच्छ भारत मिशन (ग्रा.), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन’ स्पर्धेचे आयोजन केले होते. याला उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेअंतर्गत ५ हजार ९१७ किलो प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन झाले. जिल्ह्यातील शाळांमध्ये गोळा केलेला प्लास्टिक कचरा ३१ डिसेंबरपर्यंत गोळा करून प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
‘स्वच्छ जिल्हा, पर्यटन जिल्हा’, असे नामांकन असलेल्या सिंधुदुर्गला पहिला प्लास्टिकमुक्त जिल्हा बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन’ स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या कालावधीत प्राप्त अहवालाप्रमाणे जिल्ह्यातील ६३२ शाळांनी ५ हजार ९१७ किलो प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन जमा केले आहे. या स्पर्धा कालावधीत गोळा केलेल्या प्लास्टिक व ई-वेस्टवर शिवप्रतिज्ञा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, मिरज (जि. सांगली) यांच्या माध्यमातून पुनर्प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत मालवण, सावंतवाडी व कणकवली तालुक्यातील प्लास्टिक व ई-वेस्ट गोळा करण्याचे काम सुरू आहे.
------------
कोट
स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्ह्यांतील सर्व शाळांमध्ये गोळा केलेला प्लास्टिक व ई-वेस्ट कचरा ३१ डिसेंबरपर्यंत गोळा करून पुनर्प्रक्रिया करण्यासाठी मिरज येथे पाठविण्यात येणार आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) पंचायत समिती या सर्वांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून योग्य नियोजन केले आहे.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
---------------
आठ तालुक्यांत मोहिमेला प्रतिसाद
तालुका*सहभागी शाळा*कचरा संकलन (किलोत)
देवगड*११७*७७५.१७
वैभववाडी*६७*६३६.०७
कणकवली*३७*२६७.१०
कुडाळ*३७*६७१.०५
वेंगुर्ले*१३५*११६.६७
सावंतवाडी*३७*२०३.९७
दोडामार्ग*४२*२०८.३८
मालवण*१६०*३ हजार ३७.६४

