कुडोपी कातळशिल्पांचे वैविध्य अद्भूत
11354
कुडोपीत कातळशिल्पांचे वैविध्य अद्भुत
लीना विन्सेंट ः ‘सुनापरान्त गोवा सेंटर फॉर आर्टस्’च्या पथकाची भेट
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ : ‘कुडोपी येथील कातळशिल्पांमधील सांकेतिकता, चिन्हमयता, लयबद्धता, वैविध्य आणि कलात्मक दृष्टी फारच क्वचित आढळणारी, अपवादात्मक आणि अद्भुत आहे,’ असे प्रतिपादन पणजी येथील सुनापरान्त गोवा सेंटर फॉर द आर्टस्च्या क्युरेटर आणि कला इतिहासकर लीना विन्सेंट यांनी केले.
पणजी येथील सुनापरान्त गोवा सेंटर फॉर द आर्टस्मधील कलाकार, चित्रकार, विद्यार्थ्यांनी नुकतीच कुडोपी येथील प्रागैतिहासिक कातळशिल्प ठिकाणाला भेट देऊन या कातळशिल्पांची सखोल पाहणी केली. कातळशिल्प संशोधक आणि ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या सहकार्याने या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. मूळचे मुंबई येथील व आता गोव्यात स्थायिक झालेले चित्रकार ओंकार क्षीरसागर यांच्या पुढाकाराने हा दौरा झाला.
कलाकार व चित्रकारांच्या या पथकाने सिंधुदुर्गातील कातळशिल्पांना प्रथमच भेट दिली. कुडोपी सड्यावर पोहोचल्यांनतर सतीश लळीत यांनी त्यांना सर्वप्रथम कातळशिल्पांबाबत माहिती दिली. साधारणपणे मध्याश्मयुग ते नवाश्मयुग या काळातील या परिसरात राहणाऱ्या मानवसमूहांनी मागे सोडलेल्या आपल्या पाऊलखुणांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यानंतर या पथकाने चार तास या कातळशिल्पांची पाहणी करून त्याची काही आरेखनेही केली.
श्रीमती विन्सेंट म्हणाल्या, ‘ही कातळशिल्पे महत्त्वाचा मानवी वारसा आहेत. त्या काळात या परिसरात व पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या मानवी समाजाची कलात्मक दृष्टी किती प्रगल्भ होती, याचे दर्शन त्यातून घडते. हा मानवी वारसा जपला गेला पाहिजे. त्याचा पुरातत्त्वीय अभ्यासाबरोबरच कला या अंगानेही अभ्यास झाला पाहिजे.’
या पथकात खुशबु बिस्वाल, नोएला फर्नांडिस, विश्वजित नाईक-देसाई, अशिता मातोंडकर, रूथ कॉस्टा, तमन्ना अरोरा, ग्रेगन रिकार्डो डायस, रोहित भोसले, सोनिया रॉड्रिग्ज सभरवाल यांचा समावेश होता. या पथकाने नंतर जामडुल, आचरा येथील कांदळवन सफारीचाही आनंद लुटला आणि सिंधुदुर्गच्या नैसर्गिक सौंदर्याचे दिलखुलास कौतुक केले.
......................
कातळशिल्पांचे संवर्धन आवश्यक
क्षीरसागर म्हणाले, ‘कुडोपी येथील कातळशिल्पे पाहिल्यावर असे लक्षात येते की, ती खोदणाऱ्यांना भूमिती, मिती, रेषा, चिन्हमयता यांचे ज्ञान होते. याचाच अर्थ त्या काळातील या भागातील मानवी समाज व त्यांची संस्कृती अतिशय प्रगल्भ होती. या ठिकाणाच्या आसपास मोठ्या प्रमाणात चिरेखाणी दिसतात. ही बाब लक्षात घेता त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

