खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात
‘कळंबस्ते’मार्गाची डागडुजी सुरू
वाहनचालकांतून समाधान; नागरिकांच्या आंदोलनाला यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : कळंबस्ते मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शहराजवळील कळंबस्ते ते काडवली मार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागातील नागरिकांनी दिवाळीत खड्ड्यांमध्ये फटाके वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पावसाळा संपल्यानंतर ठेकेदाराने खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्यामुळे वाहनचालक व येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कळंबस्ते ते धामणंद पंधरागावकडे हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो; मात्र कळंबस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर वाहनचालकांची कसरत होत होती. हा रस्ता खड्ड्यात की, खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. काहीवेळा किरकोळ अपघाताच्या घटनादेखील घडल्या. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिवाळी फटाके वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड येथील अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार ठेकेदाराने मागील दोन दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. खड्डे बुजवताना काही मीटर रस्त्याचे डांबरीकरण केले जात असल्याने खड्ड्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल. या कामामुळे खड्ड्यांचे ग्रहण संपणार असल्याने वाहनचालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
---
कोट
पाली ते निरबाडे मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. ते चुकवताना वाहनचालकांची कसरत होते. या मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबतची निविदाही प्रसिद्ध झाली; मात्र अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
- संतोष जाधव, पाली, चिपळूण

