नवजीवन विद्यालयात मुलांना मार्गदर्शन
नवजीवन विद्यालयात
मुलांना मार्गदर्शन
रत्नागिरी : पुण्यातील आहारतज्ज्ञ आकांक्षा जोशी-बढे यांनी फुणगूस येथील नवजीवन विद्यालयातील किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन केले. फुणगूसच्या माहेरवाशीण व विद्यालयाच्या माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान त्यांनी मनोगतात व्यक्त केला. फार मोठा आर्थिक बोजा न पडता ग्रामीण भागातील उपलब्ध धनधान्ये वापरून समतोल व सकस आहार कसा घेता येईल याचे उत्तम मार्गदर्शन पीपीटीच्या माध्यमातून केले. आवळा, चिंच, अळू, पालेभाज्या, अळीव, कुळीथ, पेरू, चिकू, केळीसारख्या परिसरातील उपलब्ध घटकातून आरोग्य चांगले राखता येते, याचे उत्तम मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. व्याख्यानाचे आयोजन करिअर मार्गदर्शन विभागाअंतर्गत शाळेचे समुपदेशक मंदार बापट यांनी केले. मंदार भागवत यांनी सूत्रसंचालन केले.
------
लाटवण येथे
विज्ञान प्रदर्शन
मंडणगड ः पंचायत समिती शिक्षण विभाग, मंडणगड व लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर, लाटवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्याचे ५३वे विज्ञान प्रदर्शन येत्या १८, १९ व २० डिसेंबर रोजी लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर, लाटवण येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन गृहमंत्री आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आमदार भाई जगताप, नगराध्यक्षा ॲड. सोनल बेर्डे व ॲड. विनोद दळवी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, तहसीलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, मंडणगड विज्ञान मंडळ अध्यक्ष शिवाजी सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
-------
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत
जय हनुमान संघ उपविजयी
संगमेश्वरः तालुक्यातील चिखली-बौद्धवाडी येथे झालेल्या १७ वर्षांखालील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत जय हनुमान, शृंगारपूर संघाला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. ९ खेळांडूसह मैदानात उतरलेल्या जय हनुमान संघाचा अंतिम सामना मोरया आरवली संघासोबत झाला. आरवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना यश जाधवने १९ धावा केल्या. त्यात एक षट्कार, दोन चौकारांचा समावेश आहे. रितेश जाधवने १० धावा करताना एक चौकार मारला. त्यांच्या खेळीमुळे शृंगारपूर संघाने ३ षटकात ३६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मोरया आरवली संघाला शृंगारपूर संघाने कडवी झुंज दिली. सार्थकने २ गडी तर सुजलने एक गडी बाद केला; परंतु या अटीतटीच्या लढतीत आरवली संघाने १ चेंडू राखून विजय मिळवला आणि विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला तीन हजार रोख आणि चषक तर उपविजयी जय हनुमान शृंगारपूर संघाला दोन हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

