कुडाळ स्थानकासाठी ३ कोटींचा प्रस्ताव
swt185.jpg
11518
कुडाळ बस स्थानक
कुडाळ स्थानकासाठी तीन कोटींचा प्रस्ताव
व्यवस्थापक रोहित नाईकः ज्येष्ठ नागरिक सेवा संघासोबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः येथील बस स्थानक इमारतीचा विस्तार करून प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी महाव्यवस्थापकांकडे तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर ज्येष्ठ नागरिक संघटनेने निदर्शनास आणून दिलेल्या सोयीसुविधा निर्माण केल्या जातील, अशी ग्वाही कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिली. आमदार डॉ. नीलेश राणे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या निवेदनाची दखल घेतली.
येथील बाजारपेठतील बस स्थानकावरील गैरसोयीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गेली ३ वर्षे सतत पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. याकडे लक्ष वेधत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलेल्या निवेदनांची दखल कुडाळ-मालवणचे आमदार राणे यांनी घेऊन राज्य परिवहन मंत्री व महाव्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ यांच्या बैठकीत याकडे लक्ष वेधले. कुडाळ स्थानकाचा वाढविस्तार करून आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार तीन कोटी पयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे संघटनेस अप्पर महाव्यवस्थापक यांनी कळविले आहे. आमदार डॉ. राणे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे त्यांचे जाहीर आभार आले. या सोयीसुविधा ३१ मार्चपर्यंत निर्माण न केल्यास १० डिसेंबरचे स्थगित केलेले आंदोलन १ एप्रिलला करण्यात येईल, असा एस.टी. प्रशासनाला संघटनेतर्फे इशारा देण्यात आला.
यावेळी कुडाळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सुरेश कोरगावकर, चंद्रकांत अणावकर, सी. टी. कोचरेकर, उदय कुडाळकर, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

