निकालाची उत्सुकता आणि गुलाल उधळण्याची तयारी

निकालाची उत्सुकता आणि गुलाल उधळण्याची तयारी

Published on

चिपळूणमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला
अंदाज अन् तर्कवितर्काला उधाण ; ढोल, ताशे पथके आरक्षित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : येथील पालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांसह नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे. उमेदवारांना मतदानानंतर आत्मपरीक्षण करण्यासाठी भरपूर कालावधी मिळाला, त्यामुळे विजयाची खात्री असलेल्या भावी नगरसेवकांनी ढोल, ताशे, बेंजो, फटाके आणि गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे.
पालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला होणार होती. परंतु उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला. थंडीचा कडाका वाढला असून पोलिसांना मात्र थंडीशी सामना करत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर कडक पहारा करावा लागत आहे. मतमोजणीची तारीख लांबल्याने उमेदवारांना मतदान केल्यानंतर तब्बल १९ दिवसाची निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली. निकाल जवळ आल्याने उमेदवारांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चिपळूण येथील पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रमेश कदम आणि युतीचे उमेश सकपाळ यांच्यात थेट लढत झाली. ठाकरे गटाने अंतिम टप्प्यात उमेदवार दिला. तसेच अपक्ष उमेदवार वैयक्तिक करिष्मा करून किती मते घेतात यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवलंबून असणार आहे. नगरसेवक पदासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने युती करून उमेदवार दिले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये स्थान मिळाले नाही त्यामुळे आमदार शेखर निकम यांनी १४ जागांवर आपले उमेदवार उभे केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्व जागांवर उमेदवार दिले मात्र त्यातील १३ उमेदवारांना आमदार भास्कर जाधव यांनी पाठिंबा दिला आणि उर्वरित पंधरा प्रभागात शरद पवार गटाच्या उमेदवारांचा जाधव यांनी प्रचार केला. काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १२ उमेदवार दिले आहेत. नगरसेवकपदासाठी उमेदवारांमध्ये चुरस असल्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे.

थंडीत गरमगरम चर्चा
कडाक्याची थंडी पडल्याने चिपळूणमध्ये रात्रीच्या वेळी चौका-चौकातून शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. शेकोट्यांतून शरीराला उष्ण तापमान घेताना नगरपालिकेच्या निकालाविषयी चर्चेला रंगत येत आहे. पक्षाचे कार्यकर्ते व इतर नागरिक आपापला अंदाज वर्तवण्यात व्यस्त आहेत. तर काही जणांमध्ये अक्षरश: पैजा लगत आहेत. अशा कडाक्याच्या थंडीत राजकीय चर्चांमुळे सर्व वातावरण गरमागरम झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com