बंधारे उभारणीला मुहूर्त सापडेना
swt1812.jpg
11550
आंबडोस (मालवण) ः व्हाळवाडी येथे वनराई बंधारा बांधतानाचे संग्रहीत छायाचित्र.
बंधारे उभारणीला मुहूर्त सापडेना
सिंधुदुर्गातील स्थिती ः टंचाईच्या झळा तीव्र होण्याची भिती
नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः कच्चे बंधारे उभारण्याच्या मोहीमेमुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात टंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत. मात्र, यंदा पाऊस थांबून दोन महिने उलटले तरी प्रशासनाकडून या मोहीमेचे नियोजन झालेले नाही. एकीकडे नद्यांचे प्रवाह मंदाऊ लागले असतानाच या मोहीमेला मुहूर्त सापडला नसल्याने भविष्यातील टंचाईसह काही भागात शेती-बागायती क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेती बागायतींसह उन्हाळी शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. पाऊस थांबून दोन महिने झाले तरी अद्यापही बंधारे बांधण्याचे प्रशासनाकडून नियोजनच झालेले दिसत नाही, त्यामुळे या मोहिमेचा शुभारंभ केव्हा होणार0 असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तरीही जानेवारीपासूनच नदी नाले कोरडे पडू लागतात. यावर्षी तर १५ मे पासून पावसाला सुरुवात झाली होती. ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. जिल्ह्यातील नदी-नाले उथळ खळखळून वाहणारे असल्याने पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळाले. सद्यस्थितीत येथील मोठ-मोठ्या नद्यातील पाण्याचा प्रवाह कमी झालेला दिसून येतो.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यात सुमारे ५००० हून अधिक कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची नियोजन केले जाते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यांना बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करून दिले जाते. मात्र, यावर्षी अद्यापही नियोजन झालेले दिसत नाही. गतवर्षी १ नोव्हेंबरपासून बंधारे बांधण्याचा मोहिमेला शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, पाऊस उशिरापर्यंत झाल्याने प्रत्यक्षात १ डिसेंबरपासून जिल्ह्यात बंधारे बांधण्याची सुरुवात झाली होती. यावर्षी डिसेंबर संपत आला तरी अद्यापही प्रशासनाकडून नियोजनच न झाल्याने या मोहिमेचा प्रारंभ केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उन्हाळी शेती व जनावरांना मुबलक पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात लोकसहभागातून कच्चे व वनराई बंधारे बांधले जातात. ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात असल्याने गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही ही वस्तुस्थिती असली तरी नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह बंद होण्याअगोदर कच्चे व वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे तरच बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होऊ शकतो. केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उशिराने फेब्रुवारी-मार्चमध्ये बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी कुठून येणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या नदी नाल्यांचा प्रवाह कमी होत आला आहे, अशा ठिकाणी जानेवारी अखेरपर्यंत बंधारे बांधून पूर्ण होण्याची गरज आहे तरच ज्या उद्देशाने बंधाऱ्यांची मोहीम जिल्ह्यात राबवली जाते तो उद्देश सफल होणार आहे, न पेक्षा तालुक्याच्या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकाच नदीवर अथवा ओढ्यावर काही अंतरावर एकाच दिवशी शेकडो बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविला जातो. यामुळे केवळ उद्दिष्टाची संख्या गाठता येते. पण, त्यामध्ये पाण्याचा साठा किती झाला? हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे प्रशासनाने बंधारे बांधण्याचे नियोजन वेळेत करून या मोहिमेचा प्रारंभ वेळीच करणे अपेक्षित आहे.
चौकट
शेतकऱ्यांसह जनावरांना फायदा
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चे व वनराई बंधारे बांधले जात असल्याने बागायतींसह भुईमूग, कुळीद, नाचणी, चवळी व पालेभाज्या यांसारख्या उन्हाळी पिकांना मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच पाळीव जनावरांसह जंगली जनावरांनाही पाणी मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील कच्चे व वनराई बंधारे उपयुक्त ठरत आहेत. मात्र, यासाठी नियोजन व बंधारे बांधण्याच्या कामाला वेळीच सुरुवात होणे गरजेचे आहे.
------------
कोट
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रशासनाकडून नियोजन सुरू असून लवकरच या मोहिमेचा शुभारंभ केला जाईल. यावर्षी जिल्ह्यात सहा हजारहून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवून शंभर टक्के बंधारे बांधून पूर्ण करण्याचे प्रयत्न राहतील.
- सुदेश राणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

